'घर मे घुसेंगे भी और मारेंगे भी', असा निर्धार करून भारतीय वायुसेनेनं आज पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या धडाकेबाज कामगिरीने देश आनंदला आहेच, पण पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीयही सुखावलेत. शहीद रमेश यादव यांच्या वीरपत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाई दलाचे आभार मानलेत, तर शहिदाच्या आईने आणखी दहशतवाद्यांना मारा, अशी भावना व्यक्त केली आहे.
शहीद रमेश यादव हे वाराणसीचे जवान. ते सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं होतं. या हल्ल्याच्या १२ दिवसांनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी आज पहाटे बालाकोटमध्ये शिरून २१ मिनिटांत १००० किलोचे बॉम्ब फेकून जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले होते आणि ही कामगिरी यादव कुटुंबीयांसाठी सुखाचे किरण घेऊन आली. मुलगा, पती गमावल्याचं दुःख कायमच राहील, पण त्याच्या हौतात्म्याचा बदला घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, अशा भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. पाकिस्तानात लपलेल्या एकेका दहशतवाद्याला शोधून मारा, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
रमेश यादव यांच्या घरातील सगळेच जण टीव्हीवर एअर स्ट्राइकची बातमी पाहत होते. ११ दिवस ज्या डोळ्यांमध्ये अश्रू होते, त्यात आज आनंदाश्रू पाहायला मिळाले. हवाई दलाने केलेल्या कामगिरीने, पुलवामाचा बदला घेतल्यानं त्यांना नवं बळ मिळालंय.
शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबीयांनीही हवाई दलाच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. एअर स्ट्राइकच्या बातमीनं आम्हाला खूप समाधान वाटलं. हे आधीच व्हायला हवं होतं, आपण किती काळ बलिदान देत राहायचं?, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसंच, शहीद विजय मौर्य यांच्या भावानेही लष्कराची पाठ थोपटली. भारतावर हल्ला करण्याची जैश दहशतवाद्यांची हिंमत होणार नाही, या दृष्टीने पाकिस्तानवर दबाव कायम ठेवा, अशी आग्रही सूचना त्यांनी केली.