नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं केलेली कारवाई अतिशय यशस्वी ठरली आहे. भारतीय हवाई दलानं केलेल्या या कारवाईनं जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहरचा या कारवाईत खात्मा झाला आहे. याशिवाय मसूद अजहरचा मेहुणा युसूफ अजहरदेखील या कारवाईत मारला गेला. भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठी भागात हवाई दलानं 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. यामध्ये जवळपास 300 दहशतवादी मारले गेले आहेत. बालाकोटमध्ये करण्यात आलेला हल्ला सर्वाधिक यशस्वी ठरला. बालाकोट जैशचा सुरक्षित आणि सर्वात मोठा बालेकिल्ला मानला जातो. बालाकोटवर हवाई दलानं अचूक निशाणा साधला. यात मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर ठार झाला. 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सचं विमान हायजॅक करण्यात आलं होतं. यातील प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारताला मौलाना मसहूद अजहरला सोडून द्यावं लागतं होतं. इंडियन एअरलाईन्सचं विमान हायजॅक करण्यात इब्राहिम अजहरची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
भारतीय हवाई दलाच्या कारवाईनं जैशला मोठा धक्का दिला आहे. मौलाना मसूद अजहरचा मेहुणा युसूफ अजहरदेखील या कारवाईत ठार झाला आहे. याशिवाय ऑपरेशन हेड मुफ्ती अजहरदेखील भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये मारला गेला. बालाकोट नियंत्रण रेषेपासून जवळपास 40 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे या भागात हल्ला होईल, याची कल्पना जैशनं केली नव्हती. 2016 मध्ये उरीचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्यामुळे यावेळी पुलवामातील हल्ल्यानंतर पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळील दहशतवाद्यांचे तळ तातडीनं हलवले होते. त्यामुळे भारतीय हवाई दलानं थेट सीमा ओलांडून 40 किलोमीटरपर्यंत जाऊन बॉम्बफेक केली आणि जैशला धडा शिकवला.