पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले, ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. या धडाकेबाज कामगिरीचं देशभरातून कौतुक झाल्यानंतर, आता त्यावरून राजकारण सुरू झालंय. पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचा निवडणुकीत फायदा होणार नाही, असं मत मांडत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
पाकव्याप्त काश्मीरवर केलेल्या एअर स्ट्राइकचा राजकीय फायदा होईल, असं ज्यांना वाटतंय त्यांना मी इतकंच सांगू इच्छितो की, १९९९ च्या निवडणुकीआधी अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुचाचणी केली होती. परंतु, त्यांना आघाडीचं सरकारच स्थापन करावं लागलं होतं, असं सूचक ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइक-२ चा फायदा नरेंद्र मोदी सरकारला होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तसे मेसेज आणि मीम्सही व्हायरल झाली आहेत, होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील जाहीर सभेत केलेलं भाषणही काहीसं त्याच थाटातलं होतं. देश सुरक्षित हातांमध्ये आहे, असं म्हणत त्यांनी मतदारांनाच साद घातलीय. त्यामुळे भाजपामध्ये वेगळाच जोश, उत्साह संचारला आहे. निवडणूक प्रचारात सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक हे चर्चेचे विषय असतील, हे नक्की. त्यामुळेच मोदीविरोधकांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याचं ओमर अब्दुल्ला यांच्या प्रतिक्रियेतून दिसतंय.