नवी दिल्ली: आम्ही ज्या भागांना लक्ष्य केलं त्या भागांना उद्ध्वस्त केलं, असं हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हटलं. कपूर यांनी लष्कर आणि नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेत भारतानं नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या कामगिरीची आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीची माहिती दिली.नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीर आणि खैबर पख्तुनख्वामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास केलेली कारवाई यशस्वी ठरल्याची माहिती जी. के. कपूर यांनी हवाई दलाच्या वतीनं दिली. मात्र या कारवाईत नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. 'मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा देणं घाईचं ठरेल. मात्र आम्ही ज्या ज्या ठिकाणी हल्ले केले, ती सर्व ठिकाणं उद्ध्वस्त केली,' असं कपूर यांनी सांगितलं. कपूर यांनी पाकिस्तानच्या सर्व दाव्यांचा कपूर यांनी समाचार घेतला. भारताच्या लष्करी तळांवर हल्ले केले नाहीत, एफ-16 विमानाचा वापर झालेलाच नाही, असे विविध दावे पाकिस्तानकडून करण्यात आले होते. हे सर्व दावे भारतीय हवाई दलानं खोडून काढले. 'प्रत्येक विमानाचा एक इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. भारतीय संरक्षण दलांना मिळालेला सिग्नल एफ-16 सोबत जुळतो. पाकिस्तानचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं, त्या ठिकाणी आम्हाला आमराम मिसाईलचे काही अवशेषदेखील सापडले आहेत. आमराम मिसाईल वाहून नेण्याची क्षमता केवळ एफ-16 विमानांमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्ताननं एफ-16 विमानाचा वापर झाला होता, हे सिद्ध होता,' अशा शब्दांमध्ये हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी पाकिस्तानच्या सर्व दाव्यांचं पोस्टमॉर्टम केलं.
आर. जी. के. कपूर यांनी पाकिस्तानचे सर्व दावे मुद्देसूदपणे खोडून काढले. 'पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचे पुरावे आहेत. एफ-16 विमानांची हालचाल दिसताच हवाई दलानं प्रत्युत्तर दिलं. हे विमान अनेक ठिकाणी दिसलं. मिग-27, मिराज 2000, सुखोई विमानांनी एफ-16 च्या हालचाली टिपल्या. एफ-16 नं लष्करी तळांजवळ हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून बॉम्ब टाकण्यात आले. लष्करी तळांच्या परिसरात बॉम्ब टाकले गेले. मात्र त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. यामुळेच हवाई दलानं प्रत्युत्तरादाखल कारवाई करत एफ-16 पाडलं. मिग 27 विमानानं एफ-16 जमीनदोस्त केलं,' अशी माहिती कपूर यांनी दिली.