Agniveer : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी अग्निवीर योजनेवरुन सरकरला घेरलं होतं. राहुल गांधी अग्निवीर योजनेबाबत खोटी माहिती पसरवत असल्याचे म्हणत सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला. अग्निवीर योजनेचा मुद्दा पेटलेला असताना आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्रा येथील एअरफोर्स स्टेशनवर तैनात असलेल्या अग्निवीरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समोर आलेलं नसले तरी या घटनेनं कुटुंबियांना जबर धक्का बसला.
आग्रा एअरफोर्स स्टेशन कॉम्प्लेक्समध्ये तैनात असलेल्या अग्निवीर श्रीकांत चौधरीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता एअरफोर्स स्टेशनमधून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. अग्निवीर श्रीकांत चौधरी हा बलिया येथील रहिवासी होता.
बलियाच्या रेवती पोलीस ठाण्यातील नारायणपूर गावातील रहिवासी २२ वर्षीय श्रीकांत चौधरी दीड वर्षांपूर्वी अग्निवीर म्हणून भरती झाला होता. सध्या आग्रा एअरफोर्स कॉम्प्लेक्समध्ये तो तैनात आहे. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास श्रीकांतने कॅम्पसमध्ये ड्युटीवर असताना त्याच्या रायफलने स्वतःवर गोळी झाडली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
अग्निवीरने श्रीकांत चौधरीने रायफलने कपाळाच्या मध्यभागी गोळी झाडली. श्रीकांतसोबत एक दिवस आधी कुटुंबियांश बोलणे झाले होते. कुटुंबीयांशी बोलताना तो तणावात असल्याचे असे कुठूनही दिसून आले नाही. कुटुंबीयांशी बोलताना तो सामान्य दिसत होता. पोलिसांना श्रीकांतच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठीही सापडली नाही. श्रीकांतच्या कुटुंबियांनीही याप्रकरणी पोलिसांत तक्रार केलेली नाही.
या घटनेनंतर श्रीकांतचा मोठा भाऊ सिद्धांत बुधवारी आग्रा येथे पोहोचला. गुरुवारी सकाळी जवानाचा मृतदेह गावात आल्यावर एकच खळबळ उडाली. श्रीकांतचा मृतदेह गंगा नदीच्या हुकुमछापरा घाटावर नेण्यात आला. तेथे हवाई दलाच्या जवानांनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर जवानाचे अंतिम संस्कार करण्यात आले.