नवी दिल्ली : मध्यरात्री जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि लष्कराने राबवलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले आहे. खराब हवामान आणि मुसळधार पावसाचा फायदा घेत पुंछ सेक्टरमध्ये एलओसीवर घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन-चार दहशतवाद्यांना रोखण्यात आले. भारतीय सैन्याची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत काही दहशतवादी मारले गेले.
दरम्यान, परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू आहे. शोध मोहिमेत घटनास्थळी सर्वत्र रक्ताच्या थारोळ्या आढळून आल्या. तसेच तीन दहशतवाद्यांना काही शस्त्रे, आयईडी आणि नार्कोसह इतर काही वस्तूंसह पकडण्यात आले आहे. लष्कराच्या जवानांनी पूंछच्या नियंत्रण रेषेला लागून असलेल्या खेरी सेक्टरच्या रॉक पोस्टजवळ तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. एक संशयित जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून शस्त्रे, दारूगोळा आणि ड्रग्जची पाकिटे देखील जप्त करण्यात आली आहेत. एक एके-४७, दोन पिस्तूल, ६ ग्रेनेड, एक आयडी आणि हेरॉइनची २० पाकिटे सापडली आहेत. सुरक्षा दल तिघांचीही कसून चौकशी करत आहेत.
पकडण्यात आलेले तिन्ही संशयित दहशतवादी असल्याचे तपासाअंती उघड झाले. मध्यरात्री झालेल्या अंधाधुंद गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान जखमी झाला आहे.