श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात काल घुसखोरी करत असलेल्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या पाच जवानांना वीरमरण आले होते. दरम्यान, जवानांच्या या बलिदानाचा भारतीय लष्कराने अवघ्या २४ तासांत बदला घेतला आहे. पुंछनंतर शोपियाँमधील इमामसाहब परिसरातील तुलरान येथे झालेल्या चकमकीत लष्कराने अजून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. आज सकाळी याबाबतची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये बिहारमधील वीरेंद्र पासवान याची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे.
सोमवारी संध्याकाळी गोपनीय माहितीच्या आधारावर दोन ऑपरेशन सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सोमवारी सांगितले होते की, विश्वसनीय माहितीच्या आधारावर शोपियाँमध्ये आज संध्याकाळी दोन ऑपरेशन सुरू करण्यात आली आहेत. तुलरान येथे चकमक सुरू झाली असून, तिथे तीन ते चार दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. तसेच शोपियाँमधील खेरीपोरा येथेही एक ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. गेल्या २४ तासांमधील ही तिसरी चकमक आहे. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी कारवायांनंतर सुरक्षा दलांनी मोहिमांना गती दिली आहे.
शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांकडून दारू-गोळ्यासह मोठ्या संख्येना शस्त्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे. मारले गेलेले तिन्ही दहशतवादी हे लष्कर ए तोयबाच्या टीआरएफशी संबंधित होते, असे पोलिसांनी सांगितले. त्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख गंदरबल येथील मुख्तार शाह अशी पटली आहे. तो बिहारमधील वीरेंद्र पासवानची हत्या केल्यानंतर शोपियाँमध्ये आला होता. पोलिसांनी त्याला सरेंडर करण्याचे आवाहन केले होते. मात्र तो ऐकला नाही. अखेर या चकमकीत तो मारला गेला.
दरम्यान, सोमवारी पुंछमध्येसुद्धा दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. या चकमकीत हात असलेले दहशतवादी ऑगस्टमध्ये पुंछमध्ये घुसखोरी करणाऱ्या समुहातील असावेत अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पुंछमधील चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानांची ओळख नायब सुभेदार जसविंदर सिंग माना, नायक मनदीप सिंग, शिपाई गज्जन सिंग, सराज सिंग, वैसाख एच. अशी पटली आहे.