नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सभागृहात जवळपास २ तास १२ मिनिटांचं भाषण केलंय यामध्ये नरेंद्र मोदी मणिपूर हिंसाचारच्या विषयावर फक्त २ मिनिटं बोलले. नरेंद्र मोदी मणिपूरबाबात बोलताना हसत होते, दोन तास चेष्टा करत होते, अशी टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
मणिपूरचं विभाजन झालं आहे. नरेंद्र मोदींना मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. ते थांबवायचं नाहीय. मणिपूर जळतेय, ते नरेंद्र मोदी विसरलेत, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. भाजपाने मणिपूरचे दोन तुकडे केले. तसेच भारतीय लष्कराला सांगितल्यास मणिपूरमधील सुरु असलेला हिंसाचार ते २ दिवसात थांबवू शकतात. मणिपूर २ दिवसांत शांत होईल, पण त्यांना मणिपूरमधीलआग विझवायची नाहीए, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, मी गेल्या १९ वर्षांपासून राजकारणात आहे. पण मी मणिपूरमध्ये जे पाहिले ते माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत पाहिले नाही. प्रत्यक्ष दौऱ्यावेळी मैतेई आणि कुकी समाजातील संघर्ष किती विकोपाला गेला आहे हे मी अनुभवलं आहे. मणिपूर हे एक राज्य राहिलेले नाही. भाजपाने त्याचे तुकडे केले आहेत. मणिपूरमध्ये एवढं सगळं घडत असतानाही पंतप्रधान हसत बोलत होते. ते मणिपूरला जाऊ शकत नाही, याची काही कारणं आहेत. पण त्यांनी किमान मणिपूरबद्दल बोलायला हवं, एवढी आमची अपेक्षा होती, अशी टिप्पणी राहुल यांनी केली.