भारतील लष्कराची गणना जगातील शूर फौजेमध्ये होते. त्याची अनेक कारणं आहेत. प्राण गेला तरी बेहत्तर पण युद्धभूमीतून माघार घेत नाहीत, असे भारतीय फौजेबाबत बोलले जाते. भारतीय लष्करातील असेच एक शूर जवान सहकाऱ्याला वाचवताना गोळी लागून जखमी झाले होते. त्यांचं नाव आहे लेफ्टिनेंट कर्नल करमवीर सिंह नत्त. त्यांचं नुकतंच निधन झालं आहे.
लेफ्टिनेंट कर्नल करमवीर सुमारे ८ वर्षांपासून मृत्यूचा सामना करत जालंधर कँटमधील लष्करी रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान, इथेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आठ वर्षांपूर्वी कमवीर सिंह नत्त हे जम्मू काश्मीरमध्ेय तैनात होते. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ते दहशतवाद्यांच्य्या शोधार्थ कुपवाडातील घनदाट जंगलांमध्ये निघाले. कुपवाडामधील हाजी नाका गावामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी एका जवानाला लक्ष्य करून गोळी झाडली. मात्र त्या जवानाला बाजूला करण्याच्या नादात ती गोळी करमवीर यांच्या जबड्याला लागली आणि ते गंभीर जखमी झाले.
करमवीर सिंह यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे काही दिवस त्यांच्यावर उपचार झाले. मात्र नंतर ते कोमामध्ये गेले. जबड्याला लागलेल्या गोळीचा परिणाम त्यांच्या मेंदूच्या न्यूरान्सवरही झाला. अशा परिस्थिती सुमारे आठ वर्षे त्यांनी मृत्यूला झुंज दिली. मात्र ही झुंज अखेर अपयशी ठरली. करमवीर सिंह यांचा जन्म १८ मार्च १९७६ रोजी झाला होता. त्यांना शौर्यासाठी सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते.