नवी दिल्ली : भारत-चीन सीमावादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारतीय लष्कराकडून उच्च क्षमतेच्या १२ हायस्पीड बोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि चीन सीमेवरील पूर्व लडाख भागात असलेल्या पँगोंग झीलमध्ये या बोटी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
भारतीय लष्कराकडून १२ हायस्पीड बोटींच्या खरेदी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या १२ बोटी उच्च क्षमता आणि आधुनिक यंत्रंणांनी सुसज्ज असतील, अशी माहिती मिळाली आहे. भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. चीनला प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम असून, या नवीन बोटींमुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढेल, असे म्हटले जात आहे.
गोवा शिपयार्डशी करार
पँगोंग झीलसह मोठ्या जलाशयातील देखरेख वाढवण्यासाठी उच्च क्षमतेच्या १२ हायस्पीड बोटींच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली असून, गोवा शिपयार्ड लिमिटेडशी यासंदर्भातील करार करण्यात आला आहे. भारतीय सेना आणि गोवा शिपयार्ड कंपनीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, मे २०२१ पासून या बोटी लष्करी सेवेत दाखल होणार असल्याची माहिती भारतीय लष्कराने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
विशेष उपकरणांनी सुसज्ज हायस्पीड बोट
गोवा शिपयार्डकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक गस्त नौका खरेदी करार पूर्ण झाला आहे. सुरक्षादलांच्या आवश्यकतांनुसार या बोटीत अत्याधुनिक उपकरणे लावली जाणार आहेत. उच्च क्षमतेच्या आणि अत्याधुनिक बोटींची निर्मिती गोव्यात करण्यात येणार आहे. या बोटी विशेष ऑपरेशनसाठी तयार करण्यात येणाऱ्या विशेष बोटींनुसार बनवल्या जाणार आहेत.
आताच्या घडीला उत्तर भारतात थंडीचा कहर कायम आहे. लडाखमधील पँगोंग झील गोठले आहे. आगामी तीन ते चार महिने हीच स्थिती कायम राहणार आहे. यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात पँगोंग झील परिसर पूर्ववत होईल, तेव्हा या अत्याधुनिक बोटी भारत-चीन सीमेवर देखरेखीसाठी तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून भारत-चीन सीमेवरून वादंग सुरू आहे. पूर्व लडाख भागात सुमारे ५० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. सध्या लडाखमधील पारा उणे २० अंशांवर गेले आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही जवानांचा कडक पाहारा सुरू आहे. भारत आणि चीनमधील सैन्यस्तरावरील चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही.