नवी दिल्ली: भारतीय लष्कर म्यानमारमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नॅशनल सोशालिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड (के) या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. म्यानमागरमधल्या कोनयांक भागात एनएससीएन (के) संघटनेनं तळ तयार केले आहेत. हा भाग नागालँडपासून अगदी जवळ आहे. म्यानमारच्या लष्करानं या भागाचे फोटो पाठवल्यावर भारतीय लष्कराकडून कारवाईला सुरुवात केली जाऊ शकते, असं वृत्त 'नवभारत टाईम्स'नं दिलं आहे. 2015 मध्येही भारतीय सैन्यानं म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. सध्या नागा बंडखोरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे. अनेक संघटनांशी बातचीत सुरू आहे. एनएससीएन (के) संघटनेत दोन गट पडले असल्यानं संवादाची प्रक्रिया सोपी होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यातील एक गट संवादासाठी तयारही झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये दहशतवाद्यांचे 38 तळ आहेत. एनएससीएन (के) नं बातचीत करावी, यासाठी म्यानमार लष्कराकडून दबाव आणला जात आहे. एनएससीएन (के) चं प्राबल्य असलेल्या भागात म्यानमारच्या लष्कराची अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी नागा बंडखोरांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सर्व संघटनांशी बातचीत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नागा समुदायाला स्वतंत्र प्रांत देण्यात यावा, या मागणीवर एनएससीएन (के) ठाम आहे. तर या मागणीवर अडून बसल्यास चर्चा केली जाणार नाही, अशी मोदी सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईकची तयारी सुरू केली आहे. म्यानमार लष्करानं दहशतवाद्यांच्या तळाची माहिती पुरवल्यावर भारतीय सैन्याकडून मोठी कारवाई केली जाऊ शकते.
भारतीय लष्कर म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 7:36 AM