नवी दिल्ली - पुलवामामधील पिंगलान येथे सोमवारी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दल आणि सीआरपीएफने मंगळवारी (19 फेब्रुवारी) संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सुरुवातीला पुलवामा दहशतवादी हल्ला आणि चकमकीदरम्यान शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. ''100 तासांच्या आतमध्ये 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यात आला'', अशी माहिती भारतीय लष्कराने यावेळेस दिली.
दरम्यान, पुलवामा हल्ल्यामध्ये ISIचा हात होता, ISIच्या मदतीने 'जैश-ए-मोहम्मद'ने हल्ला केला, असा मोठा खुलासादेखील भारतीय लष्कराने यावेळेस केला.
पत्रकार परिषदेमध्ये सीआरपीएफ, जम्मू काश्मीरचे पोलीस वरिष्ठ पोलील अधिकारीदेखील सहभागी झाले होते. चिनार कॉर्प्सचे लेफ्टनन्ट जनरल के.जी. ढिलन्न, श्रीनगरचे आयजी एसपी पाणी, CRPFचे आयजी जुल्फिकार हसन आणि GoC विक्टर फोर्सचे मेजर जनरल मॅथ्यू यांचा पत्रकार परिषदेत समावेश होता.
काश्मीरमधील मातांना भारतीय लष्कराचे आवाहन
यावेळेस भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमधील पालकांना कळकळीचे आवाहनदेखील केले. ''दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱ्या तुमच्या मुलांना समजवा आणि माघारी बोलवा. चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलांना समर्पण करायला लावा, असे आमचे जम्मू काश्मीरमधील मातांना आवाहन आहे.आत्मसमर्पण करणाऱ्यांसाठी आम्ही कित्येक चांगले उपक्रम राबवत आहोत. पण हातात बंदूक घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही'', असा स्पष्ट इशारा यावेळेस भारतीय लष्कराकडून देण्यात आला.
आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत - भारतीय लष्करसीआरपीएफचे आयजी जुल्फिकार हसन यांनी सांगितले की, 'शहीद जवानांच्या कुटुंबीयांना स्वतःला एकटे समजू नये. तुमच्यासोबत आम्ही सदैव उभे आहोत. शिवाय, देशातील निरनिराळ्या भागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या काश्मिरी मुलांसहीत आम्ही हेल्पलाइन चालवत आहोत. जेणेकरुन त्यांना कोणत्याही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागू नये'
'जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्याचा वरदहस्त'चकमकीवेळी तसंच चकमक झाल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. चकमकीच्या ठिकाणी कोणी गेल्यास आम्हाला कारवाई करावी लागेल, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे. पाकिस्तानी सैन्य आणि ISIचा जैश-ए-मोहम्मदवर वरदहस्त आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड कामरानच होता, पिंगलान चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला.
'...तर कोणताही दहशतवादी जिवंत राहणार नाही'
कोणताही दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसल्यास, तो जिवंत राहणार नाही, असा इशार कठोर इशारादेखील यावेळेस देण्यात आला. काश्मीरचे आयजी एस.पी.पाणी यांनी सांगितले की, 2018मध्ये आम्ही जैश-ए-मोहम्मदच्या 58 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यावर्षी आतापर्यंत जैश-ए-मोहम्मदच्या 12 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
14 फेब्रुवारीच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारीला जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या होत्या.
कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे.