जम्मू-काश्मीर: सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने गुरुवारी मोठा दणका दिला. भारतीय सैन्याने पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये असणाऱ्या पाकिस्तानी चौक्या रॉकेटस् आणि उखळी तोफांचा मारा करून उद्ध्वस्त केल्या. या कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्हिडीओ मेंढर सेक्टर भागातील आहे. या कारवाईत भारतीय जवानांनी पाकिस्तानी चौक्यांसह अनेक बंकर्सही उद्ध्वस्त केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे लष्करप्रमुखांकडून स्थानिक कमांडर्सना या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय सैन्याने काल पुंछ जिल्ह्यालगतच्या पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले. या भागातील राजौरी आणि मेंढर सेक्टरमधून दहशतवादी मोठ्याप्रमाणावर घुसखोरी करतात. पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी (कव्हरिंग फायर) भारतीय चौक्यांवर गोळीबार केला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये या घटना वाढल्या होत्या. यावेळीही 150 ते 200 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यासाठी भारतीय सैन्याने प्रो-अॅक्टिव्ह ऑपरेशन हाती घेतले आहे. या मोहीमेतंर्गत भारतीय सैन्याने काल या परिसरातील पाकिस्तानी चौक्यांना रॉकेट आणि उखळी तोफांच्या माऱ्याने लक्ष्य केले. या हल्ल्यात पाकिस्तानी चौक्या आणि बंकर्स पूर्णपणे बेचिराख झाली आहेत. परंतु, यामध्ये नेमकी किती जीवितहानी झाली आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या मुसक्या आवळत आतापर्यंत 20 सैनिकांना ठार केले होते. पाकिस्तानच्या अनेक चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. यानंतर पाकिस्तानने सीमारेषा परिसरातील चौक्यांवर रेड अलर्ट जारी केला आहे.
भारताचा पाकिस्तानला दणका; मेंढर सेक्टरमधील पाकच्या चौक्या उद्ध्वस्त; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 8:16 AM