जम्मू : काश्मीर मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान तोंडघशी पडल्याने त्यांच्या सैन्याने आज सकाळपासून एलओसीवर जोरदार गोळीबार केला. यामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला. यानंतर भारतीय जवानांनीपाकिस्तानच्या तीन चौक्याच उद्ध्वस्त करत सीमेपलिकडे जोरदार हल्ला चढविला.
पाकिस्तानने शनिवारी सकाळी 6.30 वाजता राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर, कलाल सेक्टर आणि पूंछच्या मनकोट सेक्टरमध्ये सकाळपासून मोर्टर आणि गोळीबार सुरू केला. यामध्ये लान्स नायक संदीप थापा हे शहीद झाले. ते देहरादूनचे आहेत. पाकच्या गोळीबाराला जवानांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिले.
भारतीय जवानांनी पाकच्या रेंजरना जोरदार प्रत्यूत्तर देत त्यांच्या सीमेपलीकडील तीन चौक्या नेस्तनाभूत केल्या. यामध्ये पाकिस्तानचे दोन अधिकारी आणि पाच सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. यानंतरही पाकिस्तानकडून सायंकाळी उशिरापर्यंत गोळीबार सुरूच होता. यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.
काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून भारतामध्ये कुरापती करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडविण्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची अधिकृत माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. काल भारतीय जवानांच्या प्रत्यूत्तरात पाकचे चार सैनिक ठार झाले आहेत.