नवी दिल्ली : लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतःची स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली आहे. ही यंत्रणा एवढी सुरक्षित आहे की, ना पाकिस्तान काही ऐकू शकणार आहे, ना चीन त्याचा डेटा चोरू शकणार. ही मोबाइल प्रणाली अनेक स्तरांवर सुरक्षित केली गेली आहे. यामुळे लष्कराचे संपूर्ण संभाषण सुरक्षित राहणार आहे.भारतीय लष्कराची ही यंत्रणा ५ जी तंत्रज्ञानावर काम करील. लष्कराने या सुरक्षित लष्करी मोबाइल यंत्रणेला ‘संभव’ असे नाव दिले आहे. १५ जानेवारीला लष्कर दिनानिमित्त पहिल्या टप्प्यात २५०० सेट लॉन्च केले जाणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ३५ हजार संच तैनात केले जातील.
‘ऑपरेशन सर्वशक्ती’ कसे राबविणार?या मोहिमेअंतर्गत जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पीर पंजाल पर्वतराजीच्या दोन्ही बाजूंनी लष्कर सक्रिय दहशतवाद्यांना लक्ष्य करील. श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्स तसेच नगरकोटा-मुख्यालय असलेल्या व्हाइट नाइट कॉर्प्स संयुक्तरीत्या मोहीम राबवतील.जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ, विशेष कृती दल आणि गुप्तचर संस्था जम्मू-काश्मीरमध्ये विशेषतः राजौरी पूंछ सेक्टरमध्ये दहशतवादी कारवायांना पुनरुज्जीवित करण्याच्या पाकिस्तानच्या योजना हाणून पाडण्यासाठी समन्वय साधतील. पाकिस्तानसमर्थित दहशतवादी संघटनांनी दक्षिणेकडील पीर पंजाल पर्वतराजीमध्ये, विशेषतः राजौरी पूंछ सेक्टरमध्ये दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे.
दहशतवाद्यांचे हल्ले ‘सर्वशक्ती’ करणार फेलजम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया वाढवण्याच्या मनसुब्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सर्वशक्ती’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ऑपरेशन सर्वशक्ती’ मोहीम ‘सर्पविनाश’च्या धर्तीवर असेल, जी २००३ मध्ये पीर पंजाल पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील त्याच भागात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरू करण्यात आली होती.
काय आहे ‘संभव’ प्रणालीची खासियत- भारतीय लष्कराचे संपर्क पूर्णपणे सुरक्षित राहतील.- ही यंत्रणा बहुस्तरीय सुरक्षा प्रणालीअंतर्गत गोपनीयपणे कार्य करील.- ही पूर्णपणे प्रत्यक्ष वेळेनुसार (रिअल टाइम) कार्य करील.- यामुळे लष्कराच्या कारवाया अधिक सक्षम होतील.
आपले सैनिक कुटुंब, जात आणि पंथ याच्यावर उठून फक्त राष्ट्राचा विचार करतात आणि ते त्यांचे कर्तव्य प्रभावीपणे पार पाडतात कारण त्यांना माहीत आहे की, जर राष्ट्र सुरक्षित असेल तर सर्व काही सुरक्षित आहे. - राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री