ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 2 - सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका ला प्रदेशात चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीच्या आगळिकीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये महिन्याभरापासून तणातणी सुरू आहे. घुसखोरी केल्यानंतरही चीनने उलटा कांगावा सुरू ठेवला आहे. भारताने सिक्कीम सीमेवर बाजू भक्कम करण्यासाठी जादा जवान तैनात केले आहेत. भारतीय सीमेवर वाढीव जवान तैनात करणे याचा अर्थ युद्धाची तयारी करणे असा होत नाही. भारतीय लष्कर तिथे स्वतःच्या सीमेचं संरक्षण करण्याच्या पार्श्वभूमीत असेल. सिक्कीम सीमेवर सध्या उद्भवलेला तणाव हा 1962च्या युद्धानंतर भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये सर्वात दीर्घकाळ सुरू राहिलेला तिढा आहे. विशेष म्हणजे भारत आणि शेजारी भूतानने निषेध नोंदविल्यानंतर माघारी हटण्याऐवजी सीमेवरील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घेतलेला आक्रमक पवित्रा, भारताचे सीमेवरील दोन बंकर नष्ट केले जाणे आणि चीनच्या राजनैतिक प्रतिक्रियेला चढलेली अधिक तिखट धार पाहता भारताने सावधानता म्हणून ही तयारी केली आहे. खुद्द लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन काही दिवसांपूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला होता. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, चीन आणि देशांतर्गत अशांतता अशा अडीच आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, अशी ग्वाहीही जनरल रावत यांनी दिली होती.डोका ला भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शारीरिक रेटारेटी होऊन परिस्थिती गंभीर झाल्यानंतर भारतीय लष्कराने मेजर जनरल हुद्द्याच्या अधिकाऱ्याला तातडीने तेथे पाठवून चीनच्या समकक्ष लष्करी अधिकाऱ्याशी ध्वजबैठक घेण्याचा प्रस्ताव दिला. दोनदा नकार दिल्यानंतर तिसऱ्या वेळी चीन ध्वजबैठकीला आला पण डोका लाच्या लालटेन भागातून भारतानेच आपले सैन्य काढून घ्यावे, असा उरफाटा प्रस्ताव त्याने दिला. चीनने सिक्किम सीमेवरील या घटनाक्रमाचे निमित्त पुढे करून नथु ला खिंडीतून जाणारी कैलास-मानसरोवर यात्राही अडवून ठेवली. त्यामुळे चीन भारताला जेरीस आणण्याचे प्रयत्न सर्व पातळ्यांवर करत असल्याचे दिसते. परंतु भारताने आपली खंबीर भूमिका कायम ठेवून या दबावाला भीक घातलेली नाही.
सिक्कीम सीमेवर भारतीय लष्करानं वाढवली कुमक
By admin | Published: July 02, 2017 10:14 PM