कोरोना काळात भारत आणि चीनमधील तणाव वाढला होता. यातच चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसखोरी करून भारतीय सैनिकांवर काटेरी लाठ्या, काठ्यांनी हल्ला केला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर भारतीय सैनिकांनी ४० हून अधिक चिनी सैनिकांना ठार केले होते. या घटनेचा व्हिडीओ भारतीय लष्कराने काही काळापूर्वीच युट्युबवर पोस्ट केला होता. परंतु, लगेचच तो डिलीट करण्यात आला आहे.
गलवान खोऱ्यात हा हल्ला झाला होता. पाण्याच्या वेगवान प्रवाहात ही झटापट झाली होती. या झटापटीवेळी भारतीय सैनिकांनी चीनच्या सैन्याला त्याच भाषेत प्रतिकार करत मोठे नुकसान पोहोचविले होते. याची यशोगाथा सांगणारा हा व्हिडीओ होता. हा व्हिडीओ पोस्ट होताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. यामुळे आर्मीच्या मुख्यालयाने हा व्हिडीओ डिलीट करायला लावला आहे.
व्हिडीओ १३ जानेवारीला पोस्ट करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये भारतीय जवानांच्या शौर्याचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच LAC वर अद्याप उघड न केलेल्या माहितीचाही उल्लेख होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनताच लष्कराच्या मुख्यालयात धावपळ उडाली होती.
वेस्टर्न कमांडची गुप्त माहिती आणि ऑपरेशनची माहिती व्हिडिओवर टाकल्याबद्दल अद्याप मुख्यालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावर काहीही बोलण्यास आर्मीच्या मुख्यालयातून नकार देण्यात आला आहे. 5-6 मे 2020 रोजी पूर्व लडाखमधील पॅंगॉन्ग तलावाच्या काठावर एक मोठी घटना घडली होती. यानंतर 15 जून रोजी गलवानमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. ज्यामध्ये कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले होते. या युद्धात 40 हून अधिक चिनी सैनिक मारले गेले.