नवी दिल्लीः केंद्रातल्या मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करत त्याचं जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले. या प्रकारानंतर पाकिस्तान सैरभैर झाला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात गरळ ओकत आहे. त्यातच आता पाकिस्तान भारतात दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा हिंसाचार घडवता येईल. परंतु भारताच्या सुरक्षा जवानांच्या चोख व्यवस्थेमुळे पाकिस्तानचे हे मनसुबे उधळले जात आहेत.भारतीय लष्कराच्या मते, पाकिस्तानी सेनेनं मंगळवारी रात्री दहशतवादी घुसवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. काश्मीरमधल्या उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांना भारतात घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानची सेना दहशतवाद्यांना एक गट भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात असून, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा त्यांना हिंसाचार माजवायचा आहे. परंतु भारताच्या सतर्क सुरक्षा व्यवस्थेमुळे पाकिस्तानचे हे इरादे धुळीस मिळाले आहेत.
उरीमध्ये दहशतवादी घुसवण्याचा ना'पाक' इरादा लष्करानं पाडला हाणून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 9:53 PM