जम्मू-काश्मीर - रियासी जिल्ह्यात आज सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास भारतीय लष्कराचं ‘चीता’ हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या दुर्घटनेतून दोन्ही वैमानिक सुखरूप बचावले आहेत. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील माहोर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या हेलिकॉप्टरने उधमपूर येथून उड्डाण केले होते. त्यानंतर ही दुर्घटना घडली. याप्रकरणी लष्कराकडून चौकशी केली जात असून याआधी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्व भूतान येथे देखील चीता हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यावेळी घडलेल्या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर असणाऱ्या रजनीश परमार व वैमानिक कॅप्टन कालझँग वांगडी यांचा समावेश होता.