सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला 11 दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठी बैठक होणार आहे. मोदी सरकारने सैन्य दलाच्या सात महत्वाच्या कमांडरना दिल्लीत बोलविले आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच एवढी मोठ्या स्तरावरील बैठक होत आहे.
तिन्ही सैन्याच्या सर्व कमांडरांचे संमेलन घेतले जाणार आहे. यासाठी या कमांडरांना दिल्लीत एकत्र बोलविण्यात आले आहे. या बैठकीत चीनसोबत सीमा सुरक्षेची परिस्थिती जाणून घेतली जाणार आहे.
8 डिसेंबरला एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सैन्यादलाच्या 12 अधिकाऱ्यांचे निधन झाले होते. यानंतर पहिल्यांदाच हे सर्व कमांडर एकत्र येणार आहेत. या कमांडरांना चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने सीमेवर केलेल्या हालचाली आणि सीमेवरील परिस्थितीबाबत माहिती दिली जाणार आहे.
चीनने भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव आहे. भारतीय भूमीत चीनने घुसखोरी केली होती, त्यांना मागे पाठविण्यात आले आहे. आतासुद्धा काही ठिकाणी चीनने घुसखोरी केल्याचा आरोप विरोधक करत आहेत.