नवी दिल्ली - भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील कारवाईचा वेग वाढवला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात अनेकदा भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात कारवाई केली असून, यामधील काही कारवाया 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे होत्या. मात्र सध्या भारतीय लष्कर कोणताही गवगवा न करता अत्यंत शांतपणे सीमेपार जात सर्जिकल स्ट्राईक करत आहे. सर्जिकल स्ट्राईकदरम्यान नियंत्रण रेषेवर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र ही कारवाई नियंत्रण रेषा पार करुन करण्यात आल्याचंच जगभरातून सांगण्यात येत होतं.
भारतीय लष्करप्रमुखांनी याआधी बोलताना सांगितलं होतं की, जितकं आपलं नुकसान होत आहे त्याच्यापेक्षा तीन ते चार पटीने जास्त नुकसान शत्रुचं होत आहे. सुंजवा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल असा इशाराही दिला होता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यात लष्कराने नियंत्रण रेषेवर ताबडतोब कारवाई केली असून किमान 10 मोठ्या कारवाया केल्या आहेत. या कारवायांमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याचा दावा लष्कराने केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ले करण्यासाठी कट रचणा-यांविरोधात आधीपेक्षा मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या मुसक्या आवळत आतापर्यंत 20 सैनिकांना ठार केलं आहे. पाकिस्तानच्या अनेक चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. यानंतर पाकिस्तानने सीमारेषा परिसरातील चौक्यांवर रेड अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानी अधिका-यांचे दौरेही वाढले आहेत. गतवर्षी सीमेपलीकडील 138 जवानांना ठार केल्याची माहिती मिळाली होती.
सुत्रांनुसार, लष्कराने गोरिला ऑपरेशन सुरु केलं आहे अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे. पाकिस्तानी लष्कर नियंत्रण रेषेवर दबावात राहिल यासाठी आम्ही रणनीती आखत आहोत. सध्या ते फक्त प्रत्युत्तर देण्याच्या परिस्थितीत आहेत. कारवाई करण्यासाठी कमांडोना मोकळे हात दिले आहेत. कारवाई करण्याआधी पुर्ण ऑपरेशन आखलं जात आहे आणि महत्वाची पाऊलं उचलली जात आहेत. आमच्या याच कारवायांना घाबरुन दहशतवादी हल्ले करण्याचे कट आखले जात आहेत असंही अधिका-याने सांगितलं आहे.