Baramulla Encounter : जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ले सुरु केले आहेत. बारामुल्लामध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. शनिवारी किश्तवाडमध्येही दोन जवान शहीद झाले तर अन्य दोघे जखमी झाले. त्यानंतर आता बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. दहशतवाद्यांच्या खात्म्याच्या हा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दहशतवादी मृत्यूच्या भीतीने पळताना दिसत आहेत.
शनिवारी बारामुल्लाच्या पट्टणमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. त्यावेळी तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं. या हल्ल्याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक दहशतवादी जीव वाचवण्यासाठी इमारतीतून पळताना दिसतोय. पळण्याचा रस्ता शोधत असताना लष्कराचे जवान गोळीबार करतात आणि त्याला ठार करतात. लष्कराने या कारवाईला अत्यंत महत्त्वाचे म्हटलं आहे. बारामुल्लाच्या चक थापर क्रिरीमध्ये ही कारवाई करण्यात आली. मारले गेलेले तिघेही कट्टर दहशतवादी असल्याची माहिती समोर आली. याशिवाय येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. लष्कराच्या १० सेक्टर राष्ट्रीय रायफल्सचे ब्रिगेडियर संजय कानोथ यांनी ही माहिती दिली. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सला या इमारतीमध्ये ३ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच काश्मीर पोलिसांनी एसओजी टीमसह घेराव घातला आणि त्यानंतर एकामागून एक दहशतवादी मारले गेले. भारतीय लष्कराने सात मिनिटांत तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर ब्रिगेडियर संजय कन्नोथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर काश्मीर जिल्ह्यातील पट्टण भागातील चक टप्पर क्रिरी येथे शोध मोहीम सुरू केली होती.
चकमकीच्या ड्रोन फुटेजमध्ये दहशतवादी ज्या घरात लपला होता त्या घरातून पळताना दिसत आहे. तो बाउंड्री वॉलच्या दिशेने झाडांकडे धावतो. त्याच क्षणी त्याला गोळी लागते आणि तो खाली पडतो. यानंतर तो भिंतीकडे रेंगाळत जाण्याचा प्रयत्न करतो. हा दहशतवादी पुढे जाताच लष्कराच्या जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला. लष्कराने दहशतवाद्याला ठार करण्यासाठी भिंतीवरही गोळ्या झाडल्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात धुर झाला.
"रिकाम्या इमारतीत लपलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या जवानांवर गोळीबार केला. आम्ही आमच्या कार्यपद्धतीनुसार त्यांना प्रत्युत्तर दिले. त्या जागेला वेढा घातला गेला आणि अधिक बल पाठवण्यात आले. दहशतवाद्यांनी रात्रभर जवानांवर जोरदार गोळीबार सुरू ठेवला, ज्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले," असे ब्रिगेडियर संजय कानोथ यांनी सांगितले.