नवी दिल्ली: भारतीय लष्कराच्या गणवेशात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. लष्कराचा गणवेश अधिक स्मार्ट आणि सुटसुटीत करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी लष्कराच्या मुख्यालयानं अधिकाऱ्यांकडून सूचना मागवल्या आहेत. लष्करी मुख्यालयानं देशातल्या जवळपास 11 संचलनालयांना यासाठी पत्र पाठवलं असल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. लवकरात लवकर तुमच्या सूचना पाठवा, असं मुख्यालयानं पत्रात म्हटलं आहे. लष्कराचा गणवेश अधिक स्मार्ट आणि सुटसुटीत व्हावा याबद्दल मुख्यालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. अनेक देशांच्या लष्कराच्या गणवेशात पँट आणि शर्टचा रंग वेगळा आहे. याच धर्तीवर भारतीय लष्कराच्या गणवेशात बदल केला जाऊ शकतो, अशी सूचना एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं केली. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर एक पट्टी असते. त्यावर लावण्यात आलेल्या स्टार्सवरुन अधिकाऱ्याचं पद कळतं. तर अमेरिका आणि ब्रिटनमध्ये छातीवर लावण्यात आलेल्या चिन्हांवरुन अधिकाऱ्यांचं पद समजतं. ही बाबदेखील गणवेशात बदल करताना लक्षात घेतली जाणार आहे.जवानांच्या बेल्टमध्येही बदल करण्याची सूचना काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा बेल्ट न वापरल्यास गणवेश अधिक स्मार्ट आणि सुटसुटीत होईल, असं काही अधिकाऱ्यांचं मत आहे. गणवेशात बदल करण्याची चर्चा याआधीही अनेकदा झाल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. लष्कराच्या गणवेशात अनेकदा लहानसहान बदल झालेले आहेत. आता पुन्हा एकदा गणवेशात बदल करण्यासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत. मात्र यासाठी बराच वेळ लागेल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
जवान आणखी हँडसम दिसणार; भारतीय लष्कराचा युनिफॉर्म बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 1:18 PM