Sig-716 Assault Rifles : नवी दिल्ली : भारताच्या लष्कराला आता अत्याधुनिक रायफल्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत लवकरच अमेरिकेकडून अतिरिक्त 73,000 SiG Sauer असॉल्ट रायफल्स आयात करणार आहे. 837 कोटी रुपयांमध्ये इतक्या रायफल्ससाठी पुन्हा ऑर्डर देण्यात आली आहे. यापूर्वीच भारताने अशा 72,400 रायफल्स खरेदी केल्या आहेत. या रायफल्सचा वापर भारतीय जवान चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर करत आहेत.
लष्कराच्या म्हणण्यानुसार, SiG-716 रायफल्ससाठी भारतीय ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील दारूगोळा वापरत आहे. एका अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, रायफल्समध्ये पिकाटिनी रेल देखील बसवण्यात आली आहे, ज्यामुळे विविध उपकरणे आणि सहायक उपकरणे, जसे की ऑप्टिकल साईट्स, यूबीजीएल (अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर), फोरहँड ग्रिप, बायपॉड्स आणि लेझर पॉइंटर्स कोणत्याही बदलाशिवाय बसवता येतात.
सिग सॉअरसोबतचा हा दुसरा करारपूर्व लडाखमध्ये चीनसोबतच्या संघर्षादरम्यान भारतात कलाशनिकोव्ह AK-203 च्या उत्पादनाला झालेल्या विलंबामुळे या रायफल्स अमेरिकेकडून खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 72,400 SiG-716 रायफल्सची ऑर्डर देण्यात आली होती. लष्करासाठी 66,400 रायफल्स, भारतीय वायुसेनेसाठी 4,000 आणि नौदलासाठी 2,000 रायफल्स खरेदी करण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी 2019 मध्ये अमेरिकन फर्म सिग सॉअरसोबत 647 कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता.
संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून मंजुरीगेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) अतिरिक्त 73,000 SIG-716 रायफल्स खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. यापूर्वी ऑगस्टमध्ये संरक्षण अधिग्रहण परिषदेने 40 हजारांहून अधिक लाइट मशीन गन (LMG) खरेदीला हिरवा कंदील दिला होता. यासाठी लष्कर अंदाजे 2,165 कोटी रुपयांच्या 40,949 एलएमजी खरेदी करत आहे.
10 वर्षात सहा लाख AK-203 रायफल्स बनवल्या जाणारउत्तर प्रदेशातील अमेठी येथे भारत आणि रशिया संयुक्तपणे AK-203 रायफल्स तयार करत आहेत. इंडो-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कोरवा फॅक्टरीमध्ये तयार केलेल्या 35 हजार AK-203 या वर्षी लष्कराच्या ताब्यात देण्यात आल्या. कोरवा फॅक्टरीमध्ये 10 वर्षात सहा लाख AK-203 रायफल्स बनवल्या जाणार आहेत. 7.62x39 मिमी कॅलिबर असलेल्या या रायफल्सची रेंज 300 मीटर आहे, परंतु त्या लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या एकूण गरजा पूर्ण करू शकतात.