नवी दिल्ली: भारतीय लष्कर आधुनिकीकरणाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील 5 वर्षांमध्ये तब्बल दीड लाख जवानांना नारळ दिला जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या लष्कराची उभारणी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून तंत्रज्ञानावर अधिक भर दिला जात आहे. सध्या भारतीय लष्करातील जवानांची संख्या 12 लाखांपेक्षा जास्त आहे. यापैकी दीड लाख ते दोन लाख जवानांना येत्या 5 वर्षांमध्ये सेवेतून कमी केलं जाणार आहे. भारतीय लष्कराची नवी रचना करण्यास पुढील महिन्यापासून सुरुवात होईल. त्यामुळे येत्या दोन वर्षांमध्ये 50 हजार जवानांना नारळ दिला जाईल. 1998 नंतर प्रथमच लष्कराकडून जवानांच्या संख्येत कपात केली जाणार आहे. 1998 मध्ये कारगिल युद्धाच्या आधी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी जवानांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 50 हजार जवानांना सेवेतून कमी करण्यात आलं होतं. आता लष्कराचं आधुनिकीकरण करण्यासाठी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जवानांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लष्करातील अनेक विभाग आता कालसुसंगत राहिलेले नाहीत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्यांची उपयोग्यता कमी झाली आहे. लष्कराच्या मुख्यालयातूनच बिपिन रावत जवानांची कपात सुरू करणार आहेत. त्यामुळे मुख्यालयातील लष्करी प्रशिक्षणाची जबाबदारी शिमल्यातील ट्रेनिंग कमांडकडे दिली जाऊ शकते. माहिती युद्ध विभाग आणि जनसंपर्क विभाग यांचं लवकरच एकत्रीकरण केलं जाऊ शकतं. शस्त्रसामग्री निर्मिती विभाग आणि धोरण आखणीची जबाबदारी असणारा विभागदेखील एकत्रित केला जाऊ शकतो.
लष्कराकडून मोठी कपात; येत्या 5 वर्षात दीड लाख जवानांना सेवेतून कमी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 10:11 AM