नवी दिल्ली, दि. 11 - डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादावर बोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे असं वक्तव्य केलं आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. डोकलाममधील वाद सुरु असताना चीनकडून तिबेटमध्ये सुरु असलेल्या हालचालींचा रिपोर्ट आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिका-याने आपली सुरक्षा भारतापेक्षा उत्तम असल्याचा केलेला दावा यासंबंधी अरुण जेटलींना प्रश्न विचारण्यात आला होता.
अरुण जेटली यांनी सांगितलं की, 'आपलं सैन्य कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे'. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराकडे पुरेशी साधनं उपलब्ध असून, यासंबंधी शंका असण्याचं कोणतंच कारण नाही असं अरुण जेटलींनी सांगितलं आहे.
याआधीही अरुण जेटली यांनी लोकसभेत बोलताना डोकलामच्या वादावर भाष्य केलं होतं. अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना सांगितलं होतं की, भारताने 1962 च्या युद्धामधून शिकवण घेतली आहे आणि लष्कर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे'. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये केलेली चूक पुन्हा न करण्याचा सल्ला दिला होता. तर बुधवारी युद्धाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे अशी चेतावणीही दिली होती.
याआधी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसेदत दिलेल्या आपल्या भाषणात, फक्त चर्चेने हा मुद्दा सुटू शकतो असं सांगितलं होतं. त्या बोलल्या होत्या की, 'दोन्ही पक्षांनी एकत्र बसून शांतपणे या मुद्द्यावर चर्चा करत उपाय शोधला पाहिजे'. तिकडे चीनी मीडिया वारंवार युद्धाची धमकी देत आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्रांमध्ये तर दर दिवशी भारतासोबत युद्ध छेडण्याची धमकी देणारी बातमी छापली जात आहे.
याआधीही चीनने भारताला धमकी देताना डोकलाममधून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. डोकलाम आपला परिसर असल्याचा दावा चीन करत आहे. दोन्ही सैन्यांनी एकत्र माघार घ्यावी असा सल्ला भारताने चीनला दिला आहे. हा परिसर भूटानचा आहे असं भारताने सांगितलं आहे. मात्र चीन हे ऐकण्यास तयार नाही.