पाटणा: केंद्र सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेच्या निषेधार्थ बिहारमध्ये उग्र आंदोलन सूरू आहे. आंदोलकांनी छपरा, कैमूर आणि गोपालगंजमध्ये आतापर्यंत 5 गाड्या जाळल्या आहेत. एकट्या छपरामध्ये तीन गाड्या जाळण्यात आल्या आहेत. 12 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला.
आमदारांवर हल्लाआंदोलनादरम्यान भाजपच्या दोन आमदारांवरही हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी छपरा सदर येथील भाजप आमदार डॉ. सीएन गुप्ता यांच्या घराची तोडफोड केली. त्याचवेळी वारिसलीगंजच्या आमदार अरुणा देवी यांच्यावरही हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी नवाडा येथील भाजप कार्यालयाला आग लावली. संतप्त युवक केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अराहमध्ये पोलिसांना हल्लेखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
17 जिल्ह्यांत उग्र निदर्शनेगुरुवारी जेहानाबाद, बक्सर आणि नवादा येथे रेल्वे थांबवण्यात आली. छपरा आणि मुंगेरमध्ये रस्ता जाळपोळीनंतर उग्र निदर्शने सुरू आहेत. सरकारने निर्णय मागे घ्यावा, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात बिहारमधील 17 जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात येत आहे. वारिसलीगंजच्या आमदार अरुणा देवी यांच्यावर नवाडा येथे आंदोलकांनी हल्ला केला. हल्ल्यावेळी आमदार गाडीत उपस्थित होत्या.
गोपालगंजमध्ये पॅसेंजर ट्रेनला आगआंदोलकांनी गोपालगंजमधील सिधवालिया रेल्वे स्थानकावर पॅसेंजर ट्रेन पेटवून दिली. ट्रेनच्या अनेक बोगी पेटवण्यात आल्या. रेल्वे स्थानकावर असलेल्या ट्रेनमधील प्रवाशांनी कसेतरी पळून आपला जीव वाचवला. तिकडे, जेहानाबादमध्ये विद्यार्थ्यांनी पाटणा-गया रेल्वे मार्गाला लक्ष्य केले आणि पाटणा-गया मेमू पॅसेंजर ट्रेन जेहानाबाद स्टेशनजवळ थांबवली. शहरातील स्टेशन परिसरातील काको मोरजवळ विद्यार्थ्यांनी जाळपोळ करून रास्ता रोको केला. बक्सरमध्येही मोठ्या संख्येने आंदोलक किल्ला मैदानाच्या रस्त्यावर उतरले. बक्सर स्थानकाशिवाय चौसा, डुमराव, रघुनाथपूर स्थानकांजवळही रेल्वे मार्ग रोखण्यात आला आहे.
तिन्ही सेवांमध्ये 4 वर्षांची भरती योजनालष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही दलांत मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने 14 जून रोजी अग्निपथ भरती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना संरक्षण दलात 4 वर्षे सेवा करावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.