भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी झालेल्या हिंसक हाणामारीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या जवानांना भारतीय लष्कारानं एका खास गाण्याच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गलवान खोऱ्यात १५ जून २०२० रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित झडप झाली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीनच्या सैन्यांचंही मोठं नुकसान झालं होतं. भारतीय जवानांनी चीनी सैनिकांना अद्दल घडवून एक इंचही जमीन बळकावू दिली नव्हती. भारतीय सैनिकांच्या आक्रमक भूमिकेपुढे चीनी सैनिकांना माघार घ्यावी लागली होती. याच चकमकीला आज १ वर्ष पूर्ण झालं. भारतीय लष्करानं गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद जवानांना समर्पित करणारं 'वो है गलवान के वीर...' गीत प्रदर्शित केलं आहे.
गलवान खोऱ्यात मोठ्या अडचणींचा सामना करत भारतीय जवान सीमेवर मोठ्या साहसानं रक्षण करत आहेत असं या व्हिडिओतून दाखवण्यात आलं आहे. भारतीय जवानांचं साहस दाखवणाऱ्या या व्हिडिओतून प्रत्येक भारतीयाला आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटेल असाच हा दमदार व्हिडिओ आहे.
नेमकं काय घडलं होतं?भारत आणि चीन दरम्यान लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ६ जून रोजी जनरल रँक स्तरावरील चर्चा झाली होती. त्यात दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली होती. चर्चेत ठरल्याप्रमाणे चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत अडून मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर १५ जूनच्या रात्री भारतीय सैनिक आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. त्यावेळी चीनी सैनिकांच्या तुलनेत भारतीय सैनिकांची संख्या कमी होती. तरीही भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांचा हल्ला मोडून काढला आणि त्यांना मागे हटण्यास भाग पाडलं. या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते.