सौदी अरेबियाचे सेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल फहद बिन अब्दुल्ला मोहम्मद अल-मुतैर सोमवारी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. हा दौरा ऐतिहासिक असून पहिल्यांदाच सौदीच्या सैन्याचा प्रमुख भारतात आला होता. फहद यांनी भारतीय लष्कर प्रमुख एमएम नरवणे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नरवणे यांनी पाकिस्तानला एवढ्या मोठ्या यातना दिल्यात की, पाकिस्तानी चिडले आहेत.
फहद आणि नरवणे यांच्या भेटीचे फोटो भारतीय लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट केले. हे फोटो पाहून पाकिस्तानची जुनी जखम पुन्हा भळभळू लागली आहे. या फोटोमध्ये दोघे जिथे भेटले त्याच्या मागची फ्रेम पाकिस्तानींनी पाहिली आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ लागली. पाकिस्तानींनी इंडियन आर्मीच्या अकाऊंटवर शिव्या शाप देण्यास सुरुवात केलीय. दुसरीकड़े भारतीयही या मैदानात उतरले आणि या फोटोची प्रशंसा करू लागले आहेत.
बॅकग्राऊंडच्या फोटोत पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाजी आहेत. बांग्लादेश मुक्ती संग्रामावेळी पाकिस्तानचा पराभव झाला, तेव्हा त्यांनी भारतासमोर आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली, तेव्हाचा हा फोटो आहे.
दोन लष्कर प्रमुखांच्या भेटीचे छायाचित्र ADG PI- Indian Army अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले, 'रॉयल सौदीचे कमांडर लेफ्टनंट जनरल फहद बिन अब्दुल्ला मोहम्मद अल-मुतैर यांनी जनरल एम एम नरवणे यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली, असे यामध्ये म्हटले आहे.