नवी दिल्ली : हिममानव प्रत्यक्षात आहे की नाही, याबद्दल अनेकदा चर्चा होते. महाकाय हिममानवाचं वर्णन तुम्ही अनेकदा पुस्तकात वाचलंदेखील असेल. मात्र खरंच हिममानव अस्तित्वात आहे का, हा प्रश्न कायम आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्कराला मकालू बेस कॅम्पजवळ पायांचे काही ठसे आढळून आले आहेत. या ठशांचा आकार पाहता, खरंच हिममानव अस्तित्वात आहे का, याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. भारतीय लष्करानं पहिल्यांदाच हिममानव 'येती'च्या अस्तित्वाचं काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. भारतीय लष्कराच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये महाकाय पायांचे ठसे दिसत आहेत. हे ठसे हिममानव 'येती'च्या पायांचे असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. 'भारतीय लष्कराच्या एका गिर्यारोहक पथकाला पहिल्यांदाच मकालू बेस कॅम्पजवळ जवळपास 32x15 इंचाचे रहस्यमयी हिममानव येतीच्या पायांचे ठसे सापडले आहेत. हा मायावी हिममानव याआधी केवळ मकालू-बरुन नॅशनल पार्कमध्ये दिसला होता,', असं लष्करानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हिममानवाच्या अस्तित्वाच्या 'पाऊल'खुणा? लष्करानं प्रसिद्ध केलेल्या फोटोंमुळे चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 7:26 AM