नवी दिल्ली - जगातील विविध देशांच्या सैन्य क्षमतेचे सर्वेक्षण करुन, कुठल्या देशाच्या सैन्याचा कितवा क्रमांक लागतो त्याची एक जागतिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 133 देशांच्या सैन्य दलांमध्ये भारतीय लष्कर चौथ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे अमेरिका, रशिया आणि चीनचा क्रमांक लागतो. भारताचा शेजारी पाकिस्तान या ग्लोबल फायरपावरच्या यादीत 13 व्या स्थानावर आहे.
भारताने या यादीत पहिल्या पाचमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. मागच्याचवर्षी पाकिस्तानने या लिस्टमध्ये पहिल्या 15 मध्ये प्रवेश केला होता. फ्रान्स, यूके, जापान, टर्की आणि जर्मनी हे देश सुद्धा पहिल्या दहामध्ये स्थान टिकवून आहेत. चीनने रशियाला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले आहे. चीनकडे आजच्या घडीला रशियापेक्षा जास्त फायटर विमाने आणि जहाजे आहेत. एकूण 50 निकषांचा अभ्यास करुन हे क्रमांक देण्यात आले आहेत.
लष्करी,नैसर्गिक स्त्रोत, भौगोलिक वैशिष्ट्य, संरक्षण उद्योग आणि सैनिक संख्या यांचा आढावा घेण्यात आला आहे. जीएफपीच्या सर्वेक्षणानुसार भारताकडे 42 लाख 7 हजार 240 सशस्त्र सैनिक आहेत. तेच चीनकडे 37 लाख 12 हजार 500 सशस्त्र सैनिक आहेत. पण चीनचे 22 लाख 60 हजार सैन्य सक्रिय आहे तर भारताकडे 13 लाख 62 हजार 500 सैनिक सक्रिय आहेत.
कोणाकडे किती अणवस्त्रे आहेत त्याची माहिती घेतलेली नाही. पण अणवस्त्र क्षमतेला काही गुण दिले आहेत. अर्थसंकल्पामध्ये भारताच्या तुलनेत चीनची संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद तीनपट जास्त आहे. तेच पाकिस्तानशी तुलना करता काही अपवाद वगळता भारत सर्वच आघाडयांवर सरस आहे.