नवी दिल्लीः भारतीय लष्कराला 40 हजार स्वदेशी बनावटीची बुलेटप्रूफ जॅकेट्स लवकरच मिळणार आहेत. ज्यांचा वापर काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद रोखण्याच्या अभियानात करण्यात येणार आहे. बुलेटप्रूफ जॅकेट तयार करणारी कंपनी एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेडचे मेजर जनरल(निवृत्त) अनिल ओबेरॉय यांनी दावा केला आहे की, ही जॅकेट्स एके-47 रायफलमधून निघालेली गोळी रोखण्यातही सक्षम आहेत.
एके-47 रायफलमधल्या गोळीला हार्ड स्टील आवरण असल्यानं ती फारच शक्तिशाली समजली जाते. आमचं जॅकेट या गोळीला रोखण्यातही सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आम्ही लष्कराला या जॅकेटचा पुरवठा ठरलेल्या वेळेआधीच करू. पहिल्या वर्षी आम्ही फक्त 36 हजार जॅकेटचा पुरवठा करू शकलो होतो. परंतु यंदा आम्ही 40 हजार जॅकेटची पूर्तता करणार आहोत.आम्हाला ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी 2021पर्यंत मुदत दिली असून, ती आम्ही 2020च्या शेवटपर्यंत पूर्ण करू, असा विश्वासही अनिल ओबेरॉय यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयानं 1.8 लाख बुलेटप्रूफ जॅकेटची ऑर्डर एसएमपीपी कंपनीला दिली होती. या जॅकेटचा पुरवठा कानपूरच्या केंद्रीय आयुध डेपोमध्ये केला जाणार असून, त्यानंतर ती जम्मू-काश्मीर आणि इतर हिंसाग्रस्त भागात पोहोचवण्यात येणार आहेत.