कोलकाता - देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह दे दोन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. सिंह यांनी आपल्या दौऱ्याची सुरूवात विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथून केली. येथील स्मारकाला अभिवादन केल्यानंतर, सिंह यांनी शस्त्रांची पूजा केली. यावेळी बोलताना भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावावर त्यांनी भाष्य केलं, लडाख सीमारेषेवर शांतता असावी आणि तणाव संपुष्टात यावा, अशी इच्छा सिंह यांनी व्यक्त केली.
लॉकडाऊन म्हणजेच जून महिन्यापासून भारत आणि चीनमधील संबंध ताणले असून गलवान घाटीत भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यामध्ये, देशाच्या 20 जवानांना वीरमरण आले. चीनसोबतच्या या झटापटीच्या संघर्षात भारतानेही चोख प्रत्युत्तर देत चीनच्या जवळपास 40 सैन्यांना ठार केले होते. लडाख सीमारेषेवरील या संघर्षाची धग अद्यापही कायम असून चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, भारतीय सैन्य चीनच्या या कटूनितीला जशास तसे उत्तर देत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनीही लडाख सीमारेषेवर जाऊन चीनला ठणकावले होते. तसेच, भारत हा शांतीप्रिय देश असून विस्तारवादाला आपल्याकडे थारा नसल्याचंही मोदींनी म्हटलं होतं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सुकना युद्ध स्मारक येथे जवानांना संबोधित करताना, त्यांच्या वीरतेचं आणि धाडसाचं कौतुक केलंय. भारत आणि चीन या दोन्ही देशात शांतीपूर्ण संबंध असावेत, सीमारेषेवर शांतता रहावी आणि तेथील तणाव संपुष्टात यावा, अशी इच्छा सिंह यांनी व्यक्त केली. मात्र, भारत देशाचं सैन्य आपल्या जमिनीच्या एक इंचही भूभागावर कोणाला कब्जा करु देणार नाही, याची खात्रीही त्यांनी देशवासीयांना दिली. राजनाथसिंह हे पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून तेथील युद्ध स्मारक व सैन्य दलाच्या भेटी घेत आहेत. सुकना युद्ध स्मारक येथे जाऊन राजनाथसिंह यांनी शहीदांना आदरांजली अर्पण केली, तसेच सैनिकांचे बलिदान कधीही विसरता येणार नसल्याचे म्हटले.
दरम्यान, दार्जिलिंग दौऱ्यात सिंह यांनी सीमा कडक संघटना (बीआरओ) द्वारे उभारण्यात आलेल्या गंगटोक-नाथुला रोडचे उद्घाटन केले, सिक्कीममध्ये 65 किमीच्या रस्ते निर्मित्तीचं काम प्रगतीपथावर असल्याचंही सिंह यांनी म्हटलं.