नवी दिल्ली - नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या लढाईत भारतीय सैन्य वर्चस्व गाजवत असून भारतीय लष्कराच्या दणकेबाज कारवाईपुढे पाकिस्तानी सैन्य पुरते हतबल झाले आहे. पाकिस्तानची बॉर्डर अॅक्शन टीम तसेच दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या भारतीय लष्कराच्या रडारवर आहेत. मागच्या आठवडयाभरात भारतीय सैन्याने अशा सहा चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. इंडिया टुडेेने हे वृत्त दिले आहे.
सीमेपलीकडे सुरु असलेल्या घडामोडींवर भारतीय सैन्य दल बारीक लक्ष ठेऊन आहे. भारताविरोधात दहशतवाद्यांचा वापर करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावरच भारतीय लष्कराकडून कारवाई सुरु आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीली त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात आहे. लष्कराच्या युनिटस पाकिस्तानी सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत. भारतीय जवानांवर छुप्या हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून बॅट फोर्सेसचा वापर केला जातो. गरज पडल्यास पाकिस्तानचा हल्ला परतवून लावण्यासाठी आवश्यक कारवाई केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.
चार दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद झाल्यानंतर भारताने उरी सेक्टरमध्ये प्रत्युत्तरादाखल जोरदार कारवाई केली. रामपूर, हाजी पीर आणि लीपा व्हॅलीमधील पाच तळांवर भारतीय लष्कराने कारवाई केली. रॉकेट हल्ला करुन पाकिस्तानी तळ पूर्णपणे उखडून टाकले. गेल्या काही दिवसांपासून या तळावर चालणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. अखेर संधी मिळताच कारवाई करण्यात आली.
लष्कराच्या स्थानिक कमांडर्सना कारवाई करण्यासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आले आहे असे 15 कॉपर्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल भट्ट यांनी सांगितले. पहिल्या 55 दिवसात भारताच्या धडक कारवाईत 23 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. भारतात घुसखोरी करण्यासाठी पीर पंजालच्या डोंगर रागांमध्ये 200 दहशतवादी दबा धरुन बसले आहेत अशी माहिती आहे.