अहमदाबाद : मानवाला अंतराळात घेऊन जाण्याच्या भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी योजनेतील चाचणी प्रक्षेपण येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणार आहे. त्यानंतर अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अवकाशयानाचे पुढील वर्षी प्रक्षेपण करण्यात येईल, असे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (इस्रो) अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले.
फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) येथे गुरुवारी एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, चाचणी प्रक्षेपणासाठी तयार केलेल्या यंत्रणेच्या विविध भागांची जुळणी करण्याचे काम सध्या श्रीहरिकोटा येथे सुरू आहे. गगनयान मोहिमेसाठी चाचणी प्रक्षेपण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही नवीन अग्निबाण तयार केला असून त्याला टेस्ट व्हेईकल असे म्हटले जाते. चाचणी प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर गगनयान मोहिमेच्या मुख्य टप्प्याला प्रारंभ होणार आहे.
एस. सोमनाथ यांनी सांगितले की, पुढच्या वर्षीच्या प्रारंभी गगनयान मोहिमेच्या अंतर्गत अंतराळवीरांसह अवकाशयानाचे प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. अंतराळवीरांना पुन्हा सुरक्षितरीत्या पृथ्वीवर परत आणणे हा गगनयान मोहिमेतला महत्त्वाचा टप्पा व अंतराळवीरांची सुरक्षा हा प्रमुख मुद्दा आहे. अंतराळयानाचे प्रक्षेपण करताना अग्निबाणामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर त्या समस्येवर मात करण्यासाठी आवश्यक असलेली पर्यायी यंत्रणाही इस्रोने तयार केली आहे. (वृत्तसंस्था)
परम विक्रम-१०००फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये परम विक्रम-१००० या सुपरकॉम्प्युटरचे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. परम विक्रम-१००० हा सुपरकॉम्प्युटर फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये सध्या वापरात असलेल्या विक्रम-१००पेक्षा दहापट वेगाने काम करतो. त्यामुळे शास्त्रज्ञांना मोलाची मदत होणार आहे.