नवी दिल्ली : मद्य सम्राट विजय मल्ल्या याच्याकडील कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी भारतीय बँका ब्रिटनच्या सरकारी संस्थांच्या मदतीने काम करीत असून, ते व्यवस्थित सुरू आहे, असे स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) म्हटले आहे.भारतीय बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून विजय मल्ल्या ब्रिटनमध्ये पळून गेला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय बँका ब्रिटनमध्ये न्यायालयीन लढाई लढत आहेत. मल्ल्याच्या ब्रिटनमधील मालमत्तांची चौकशी करण्याचे, तसेच त्यात प्रवेश करण्याचे अधिकार एका ब्रिटिश न्यायालयाने बँकांना नुकतेच दिले आहेत. त्यामुळे बँकांचे मनोबल उंचावले आहे.एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) अरिजित बसू यांनी पत्रकारांना सांगितले की, ब्रिटिश न्यायालयाच्या आदेशामुळे आम्ही खूश आहोत. अशा प्रकारच्या आदेशामुळे आम्ही आमच्या अडकलेल्या मालमत्तांची वसुली करू शकू, अशी आशा आम्हाला वाटते. मल्ल्याकडे थकलेल्या कर्जापैकी नेमके किती कर्ज वसूल होईल, याचा आकडा देण्याचे टाळून बसू यांनी म्हटले की, जास्तीत जास्त कर्जाची वसुली होईल, अशी आशा आम्हाला वाटते.निकाल बँकांच्या समूहाच्या बाजूनेकिंगफिशर एअरलाइन्सला एसबीआसह १३ बँकांच्या समूहाने कर्ज दिले आहे. या प्रकरणी ब्रिटनच्या न्यायालयाने अलीकडेच भारतीय बँकांच्या बाजूने निर्णय दिला आहे. कर्जवसुलीसाठी अधिकारी मल्ल्याच्या इमारतींत प्रवेश करून गरज भासल्यास बळाचा वापरही करू शकतात.
मल्ल्याकडील थकबाकी वसुलीसाठी भारतीय बँकांचे ब्रिटनसोबत काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 3:05 AM