नवी दिल्ली - बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्याना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी एक नेटवर्क सक्रिय आहे. गुवाहाटी आणि कोलकातामधील दलाल रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेत. इतकंच नाही तर रोहिंग्याकडे भारतीय नागरिकत्व असावं यासाठी त्यांना बनावट कागदपत्रंही उपलब्ध करुन दिली जात आहेत. काही रोहिंग्यांकडे तर बनावट भारतीय कागदपत्रं उपलब्ध आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. इतकंच नाही तर भारतात घुसखोरी केल्यानंतर येथील मुस्लिम संघटनांनी मदत करावी यासाठी रोहिंग्या प्रयत्न करत आहेत. जेणेकरुन कोणीही त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही आणि देशाबाहेर काढणार नाही.
गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह भारत - बांगलादेश सीमारेषा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालसहित पूर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी रोहिंग्यांच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. कोलकातामध्ये घुसखोरी करण्यासाठी मदत करणा-या दलाल आणि एजंट्सच्या मुसक्या आवळण्यावरही यावेळी चर्चा केली जाईल. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, हे दलाल बांगलादेशमधून घुसखोरी करण्यासाठी रोहिंग्यांना मदत करुन त्यांना झोपडपट्टी आणि भाड्याने घरं देण्यासाठी मदत करणार आहेत. यानंतर त्यांना देशातील इतर भागांमध्ये पाठवण्यात येईल.
गृहमंत्रालयाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'भारत आणि बांगलादेशदरम्यान 4 हजार किमी लांब सीमारेषा आहे. यामधील 1900 किमी सीमारेषा बंगालला जोडून आहे. याठिकाणी दोन असे क्रॉसिंग पॉईंट्स आहेत जिथून घुसखोरी केली जाते. आणि यासाठी स्थानिक एजंट्स मदत करतात. स्थानिक पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहून कारवाई करणं गरजेचं आहे, कारण रोहिंग्या भविष्यात धोका ठरू शकतात. राजनाथ सिंह भारत-बांगलादेश बॉर्डर बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर हा मुद्दा उपस्थित करणार आहेत'.
गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार, संपुर्ण भारतात जवळपास 40 हजार रोहिंग्या बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. यामधील 7096 लोक जम्मू काश्मीर, 3059 हैदराबाद, 1114 मेवाडमध्ये, 1200 लोक पश्चिम उत्तर प्रदेश आणि 1061 लोक दिल्लीत राहत आहेत. याशिवाय केरळ आणि तामिळनाडूतही रोहिंग्या वास्तव्य करत असल्याची माहिती आहे. जम्मू, हैदराबाद आणि अंदमान निकोबार बेटावरही ते राहत असल्याची माहिती असल्याचं एका अधिका-याने सांगितलं आहे.