भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश पाल यांना दिवसभर अस्वस्थ वाटत होते, यामुळे त्यांना राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि अँजिओ टेस्ट करण्यास सांगितले होते. मात्र त्यांना वाचवता आले नाही.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रुग्णालयात जाऊन राकेश पाल यांना श्रद्धांजली वाहिली. राकेश पाल यांचे पार्थिव दिल्लीत आणले जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे, ते एक सक्षम आणि वचनबद्ध अधिकारी होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली ICG भारताची सागरी सुरक्षा मजबूत करण्यात मोठी प्रगती करत आहे. त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज चेन्नईत तटरक्षक दलाच्या सागरी बचाव आणि समन्वय केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल हे समारंभाचे सूत्रसंचालन करण्यासाठी चेन्नईत होते.
राकेश पाल हा उत्तर प्रदेशचा रहिवासी होते. गेल्या वर्षी त्यांची भारतीय तटरक्षक दलचे २५ वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी होते. राकेश पाल हे जानेवारी १९८९ मध्ये भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले. त्यांनी द्रोणाचार्य, इंडियन नेव्हल स्कूल, कोची आणि यूकेमधील इलेक्ट्रो-ऑप्टिक्स फायर कंट्रोल सोल्यूशन कोर्समधून तोफखाना आणि शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये व्यावसायिक कौशल्य घेतले.
राकेश पाल यांना ३४ वर्षांचा अनुभव होता. याशिवाय त्यांनी कोस्ट गार्ड मुख्यालय, ICGS विजित, ICGS सुशेथा कृपलानी, ICGS अकालीबाई आणि ICGS-03 येथे संचालक आणि प्रधान संचालक यासारख्या विविध प्रतिष्ठित कर्मचारी पदांवर काम केले आहे.