Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने पाकिस्तानी जहाजावरुन दोन तासांच्या पाठलागानंतर सात भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे. पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीच्या पीएमएस नुसरत या जहाजावरुन मच्छिमारांना बळजबरीने अटक करून सीमेवर नेले जात होते. भारत आणि पाकिस्तान सीमेजवळून या मच्छिमारांना पकडण्यात आलं होतं. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने पाकिस्तानी जहाजाचा पाठलाग करुन भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे.
रविवारी पाकिस्तानी जहाज भारतीय मच्छिमारांना अटक करण्यासाठी पाकिस्तान-भारत सागरी सीमारेषेजवळ पोहोचले होते. मात्र तिथे तैनात असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या अग्रीम नावाच्या जहाजाने तातडीने कारवाई करत पाकिस्तानी जहाजाचा दोन तास पाठलाग केला आणि मच्छिमारांची सुटका केली.
संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पीएमएस नुसरत जहाज हे कालभैरव या मासेमारीच्या बोटीतील मच्छिमारांना घेण्यासाठी भारतीय जलक्षेत्रात आले होते. भारतीय तटरक्षक दलाने तातडीने प्रत्युत्तर देत मच्छिमारांची सुटका केली. रविवारी दुपारी ३:३० वाजता, भारतीय तटरक्षक दलाच्या अग्रीम जहाजावर मदतीसाठी फोन आला होता. कालभैरव या भारतीय मासेमारी नौकेतून हा कॉल आला होता. कालभैरव जहाज नो-फिशिंग झोनजवळ मासेमारी करत होते. पाकिस्तानी जहाजाने त्यांना पकडून ठेवले होते. कालभेरववरच्या सात मच्छिमारांना पकडून पाकिस्तानात नेण्याचा पीएमएस नुसरत डाव होता.
पण अग्रीमने पूर्ण वेगाने जाऊन पाकिस्तानी जहाज नुसरतला रोखले. दोन तास समुद्रात शर्यत सुरू होती. यानंतर पाकिस्तानी जहाजाला भारतीय मच्छिमारांना सोडण्यास सांगण्यात आले. शेवटी धमक्या आणि समजूतदारपणा कामी आला. पण काळभैरव बोट तुटली. त्यामुळे ती समुद्रातच बुडाली.
यानंतर अग्रीम जहाज सोमवारी गुजरातमधील ओखा बंदरात मच्छिमारांसह परतले. या प्रकरणी आता गुप्तचर संस्था, राज्य पोलीस आणि तटरक्षक दल त्या मच्छिमारांची संयुक्तपणे चौकशी करत आहेत. याशिवाय समुद्रात नेमकं काय झालं याचाही तपास केला जात आहे.