मुंबई: भारतीय तटरक्षक दलानं व्यापारी जहाजांच्या मदतीनं अरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छिमारांची सुटका केली आहे. अचानक हवामान बिघडल्यानं मच्छिमारांच्या ५० बोटी समुद्रात अडकल्या होत्या. याबद्दलची माहिती तामिळनाडूमधील मच्छिमार संघटनांकडून भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. पश्चिम गोव्यापासून २५० नॉटिकल मैल अंतरावर मच्छिमार बोटी अडकल्या होत्या. तटरक्षक दलानं तातडीनं मदतकार्य सुरू करत सर्व मच्छिमारांची सुखरुप सुटका केली. खराब हवामानामुळे ५० मच्छिमार बोटी समुद्रात अडकल्याची माहिती ३ डिसेंबरला भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. भरसमुद्रात अडकलेल्या मच्छिमारांना तातडीनं मदत देणं गरजेचं असल्यानं तटरक्षक दलानं या भागात असणाऱ्या सात व्यापारी जहाजांशी संपर्क साधत त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. या जहाजांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे अडकलेल्या मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला. यानंतर लगेचच तटरक्षक दलाच्या बोटी मच्छिमारांच्या सुटकेसाठी रवाना झाल्या.