नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. तर आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. याच दरम्यान भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसींचा डोस विकत घेण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे.
भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्धांना पहिल्या फेरीत लस दिली जात आहे. स्टील उत्पादक श्रेत्रातील जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड, महिंद्रा ग्रुप आणि आयटीसीसारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घेण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे. सरकारकडून प्रथामिक स्तरावर कोरोना लसीची मागणी संपल्यानंतर ही लस बाजार उपलब्ध होईल. त्यावेळी या मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाची लस विकत घेतील असं सांगितलं जात आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांत कोरोना लसीकरण मोहिमेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
"लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क केला असून आमच्यात सध्या चर्चा सुरू"
कॉर्पोरेट ह्यूमन रिसोर्सचे प्रमुख असणाऱ्या अभिताव मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार "आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करायचं आहे. यासाठी आम्ही लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क केला असून आमच्यात सध्या चर्चा सुरू आहे. टाटा स्टीलने कोरोनाची लस व्यवसायिक पद्धतीने बाजारपेठेत उपलब्ध झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येईल असं म्हटलं आहे. तसेच गेल्या वर्षी जगभरामध्ये लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंध असणाऱ्या लॉकडाऊननंतर आता कारखाने आणि उद्योग व्यवसाय हळूहळू सुरळीत होत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. अनेकजण आपल्या मूळ गावी परतले होते. याचा फटका कंपन्यांनाही बसला होता.
"सरकारने ठरवलेल्या धोरणांनुसारच आम्ही यासंदर्भातील निर्णय घेऊ"
जेएसपीएलचे चीफ ह्यूमन रिसोर्सचे ऑफिसर असणाऱ्या पंकज लोचन यांनीही आम्ही मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा करणाऱ्या लसनिर्मात्या कंपनीच्या संपर्कात असल्याची माहिती दिली. सर्व कोरोना योद्धांचे लसीकरण झाल्यानंतर बाजारपेठेत लस उपलब्ध होईल तेव्हा आम्ही ती आमच्या कर्मचाऱ्यांसाठी घेऊ इच्छितो असंही म्हटलं. मात्र कंपनीने किती संख्येने कोरोनाच्या लसी विकत घेणार आहे याबाबत माहिती दिलेली नाही. महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी आम्ही आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाची लस विकत घेऊ इच्छितो असं सांगितलं आहे. तसेच सरकारने ठरवलेल्या धोरणांनुसारच आम्ही यासंदर्भातील निर्णय घेऊ असंही म्हटलं आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरनेही आपल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्यास सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.