काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. त्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे.
“आम्ही ही लढाई कायदेशीर आणि राजकीय दोन्ही मार्गाने लढू. आम्ही घाबरणार नाही किंवा गप्प बसणार नाही. पंतप्रधानांच्या अदानी महामेगा घोटाळ्यात जेपीसीऐवजी राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. भारतीय लोकशाही.. ओम शांती,” असं काँग्रेस नेता जयराम रमेश म्हणाले.
दरम्यान, “न्यायालयाच्या निर्णयानंतर २४ तासांच्या आत ही कारवाई आणि त्याचा वेग पाहून मला धक्का बसला आहे. हे आपल्या लोकशाहीसाठी अशुभ लक्षण आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी दिली.
इंदिरा गांधींच्या विरोधातही हीच पद्धत“राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व संपवणे हे हुकूमशाहीचे आणखी एक उदाहरण आहे. हीच पद्धत त्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधातही अवलंबली होती आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले होते, हे भाजपने विसरता कामा नये. राहुल गांधी हा देशाचा आवाज आहेत, जो आता या हुकूमशाहीविरोधात आणखी मजबूत होईल. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी भाजप सरकार राहुल यांच्याविरोधात दडपशाही पावले उचलत आहे,” अशी प्रतिक्रिया राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली.