वॉशिंग्टन, दि. 15 - अमेरिकेतील कॅन्सासमध्ये एका भारतीय डॉक्टरची चाकूनं भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अच्युत रेड्डी असे हत्या करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. ते 57 वर्षांचे होते. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या रुग्णालयातील एका रुग्णानेच त्यांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मनोचिकित्सक अच्युत रेड्डी यांचा मृतदेह त्यांच्या क्लिनिकच्या मागील परिसरात आढळून आला. त्यांच्या शरीरावर चाकूनं अनेक वार करण्यात आल्याचे आढळून आले. अच्युत रेड्डी मूळचे तेलंगणाचे रहिवासी होते.
दरम्यान, डॉक्टर अच्युत रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी 21 वर्षीय उमर राशिद दत्त या तरुणाला अटक करण्यात आली आहे. डॉ. रेड्डी यांची हत्या बुधवारी संध्याकाळी करण्यात आली होती. पोलिसांनी संध्याकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास यासंबंधीची माहिती मिळाली. धक्कादायक बाब म्हणजे डॉ. रेड्डी यांची हत्या करुन उमर रक्तानं माखलेले कपडे खालून भररस्त्यात तसाच फिरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर हा रेड्डी यांचा रुग्ण होता. घटनेच्या दिवशी तो डॉ.रेड्डींसोबतच त्यांच्या कार्यालयात होता. यावेळी त्यांच्या कार्यालयातून ओरडण्याचा आवाज येत होते. यावेळी कार्यालयातील एक कर्मचारी तेथे गेली आणि तिनं जे काही पाहिलं त्यानं तिला धक्काच बसला. यावेळी उमर डॉ.रेड्डींवर चाकूनं वार करत होता. तिनं त्याला रोखण्याचा प्रयत्नही केला. यादरम्यान डॉ.रेड्डी घटनास्थळावरुन कसेबसे निसटले. मात्र उमरनं त्यांचा पाठलाग करुन त्यांच्यावर चाकूनं सपासप वार केले. दरम्यान, डॉ. अच्युत रेड्डी यांची हत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. तर उमरची आई भारतीय असल्याची माहिती समोर आलेली आहे.
अच्युत रेड्डी यांनी 1986 मध्ये हैदराबाद येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1989 मध्ये ते अमेरिकेत स्थायिक झाले. रेड्डींनी तेथे हॉलिस्टिक सर्व्हिस नावाचे रुग्णालय सुरू केले. रेड्डी यांच्या पश्चात त्यांची पत्नी बीना रेड्डी आणि तीन मुले आहेत. राधा, लक्ष्मी आणि विष्णू अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे आई-वडीलही राहतात.