नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख गीता गोपीनाथ पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. जागतीक विकासदरात झालेल्या घसरणीसाठी भारत जबाबदार असल्याचे गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे. तसेच 2020 मध्ये भारताचा विकासदर 4.8 एवढा राहिल असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे त्या आता भाजपच्या निशान्यावर येणार असून त्यांनी तशी तयारी करावी अशी टीका माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसनेते पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारवर केली आहे.
चिदंबरम यांनी ट्विटरवरून मोदी सरकारला टोला लागवला आहे. मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर गीता यांनी टीका केली होती. त्यामुळे मला वाटत की आता आयएमएफ आणि गीता गोपीनाथ यांनी भाजपच्या मंत्र्यांकडून होणाऱ्या टीकेसाठी तयार राहावे, असा सल्ला चिदंबरम यांनी दिला आहे.
एयएमएफने 2019-20 मध्ये भारताचा विकासदर 5 पेक्षा कमी राहिला, असा अंदाज वर्तविला आहे. यापेक्षाही खाली आल्यास आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका चिदंबरम यांनी केली.
दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषद अर्थात वर्ल्ड इकोनॉमिक्स फोररमध्ये गीता बोलत होत्या. भारताचा जीडीपी घसरला तर त्याचा परिणाम जगाच्या आर्थिक विकासदरावर होतो. त्यामुळेच आम्ही जागतिक विकासदराचा अंदाज 0.1 टक्के कमी केला आहे. भारताचा विकासदर घटल्यामुळेच असं कराव लागल्याचं गीता यांनी सांगितले.
भारताप्रमाणे इतर विकसनशील देशांतील मंदीमुळे देखील जागतिक विकासदर घटला आहे. 2020 मध्ये भारताचा विकासदर 4.8 टक्के राहिल असा अंदाज व्यक्त करताना गीता यांनी जागतिक विकासदराच्या 80 टक्के घसरणीला भारतच जबाबदार असल्याचे सांगितले.