संयुक्त राष्ट्रे : कोविडच्या प्रकोपानंतर भारतामध्ये कमी प्रमाणात का होईना पण आर्थिक वाढ होण्याची शक्यता असून मोठी बाजारपेठ असल्याने हा देश गुंतवणूकदारांचे आकर्षण राहण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन विचार करता दक्षिण तसेच नैऋत्य आशियामधील सर्वाधिक लवचिक अर्थव्यवस्था असा भारताचा लौकिक राहण्याची अपेक्षाही व्यक्त केली गेली आहे.
‘आशिया आणि प्रशांत क्षेत्रामध्ये होत असलेली थेट परकीय गुंतवणूक ’ याबाबतच्या एका अहवालामध्ये वरील मत वर्तविण्यात आले आहे. या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की, सन २०१९मध्ये दक्षिण आणि नैऋत्य आशियामध्ये झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये २ टक्क्यांची घट झाली आहे. आधीच्या वर्षाशी तुलना करता ती १ अब्ज डॉलर कमी झाली. भारतामध्ये मात्र या काळामध्ये अन्य देशांपेक्षा अधिक प्रमाणामध्ये थेट परकीय गुंतवणूक (५१ अब्ज डॉलर) झालेली दिसून आली.
मागील वर्षापेक्षा ही गुंतवणूक २० टक्के अधिक झाली आहे. यापैकी काही देशांमधून तर ही टक्केवारी ७७ टक्क्यांपर्यंत गेली असल्याचे अहवालामध्ये नमूद केले गेले आहे. भारतामध्ये आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी बहुतांश गुंतवणूक ही माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये आली आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये स्थानिक संपन्न परिस्थितीचा लाभ मिळत असल्याने गुंतवणूक वाढत आहे. विशेष म्हणजे ई-कॉमर्सच्या क्षेत्रामध्येही भारतात मोठी गुंतवणूक आली आहे.
दीर्घकालीन विचार करता भारतीय अर्थव्यवस्था ही या क्षेत्रामधील सर्वाधिक लवचिक अर्थव्यवस्था राहण्याचा अंदाज आहे. कोरोना पश्चातच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ भलेही कमी राहिली तरी ती शाश्वत स्वरूपाची असेल, त्यामुळे भारतातील परकीय गुंतवणूक सुरुच राहील, असे मतही व्यक्त झाले आहे.