ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 6 - अन्य प्रवासी साधनांच्या तुलनेत हवाई प्रवासाचा खर्च प्रचंड असतो. हवाई प्रवासमुळे वेळ वाचतो हे जरी खरे असले तरी, विमान तिकीटांच्या दरांमुळे अनेकजण रस्ते, रेल्वेमार्गाचा पर्याय निवडतात. पण आता लवकरच अमेरिकेत हवाई प्रवास स्वस्त होऊ शकतो. आयआयटी दिल्लीमधून मॅकनिकल इंजिनिअरची पदवी घेणारे आशिष कुमार स्वस्त हवाई प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या प्रकल्पावर अमेरिकेत काम करत आहेत.
आशिष कुमार यांच्या झ्युनम एरो कंपनीने 2020 पासून हायब्रीड विमानांचे व्यावसायिक उत्पादन सुरु करण्याचे उद्दिष्टय ठेवले आहे. ही हायब्रीड विमाने इलेक्ट्रीकवर चालतील. छोटया आकाराच्या हायब्रीड विमानांमुळे वेळ आणि हवाई प्रवासाचा खर्च कमी होईल तसेच छोटया शहरांना हवाई सेवेने जोडता येणार आहे.
अमेरिकेप्रमाणे भारतातही ही विमाने मोठया प्रमाणावर उपयुक्त ठरु शकतात. भारतालाही ही विमाने विकण्याचा झ्युनमची योजना आहे. बोईंग आणि जेट ब्ल्यू या बडया कंपन्यांनी या प्रकल्पासाठी झ्युनमला पाठबळ दिले आहे. हवाई कंपन्यांना आमची विमाने स्वस्तात उपलब्ध होतील. व्यावसायिक विमानांप्रमाणे ही विमाने फार उंचीवरुन उड्डाण करणार नाहीत. त्यांचा वेग कमी असेल पण ही विमाने कुठल्याही धावपट्टीवर उतरु शकतात असे आशिष कुमार यांनी सांगितले.
पहिले हायब्रीड विमान 20 आसनी असेल. 1 हजार मैलापर्यंत उड्डाण करु शकणारे इलेक्ट्रीक विमान बनण्याचे झ्युनमचे लक्ष्य आहे. अन्य विमानांच्या तुलनेत हायब्रीड विमानांमधून 80 टक्के कमी उत्सर्जन होईल. ही विमाने चालवण्याचा खर्चही कमी असल्याने विमान कंपन्यांना सर्वसामान्यांना परवडणारे तिकीट दर ठेवता येतील.