नवी दिल्ली, दि. 4 - भारतातल्या ईव्हीएम मशिन्स या अमेरिकेच्या व्होटिंग मशिन्सपेक्षा उत्तम असून, हॅक प्रूफ आणि विश्वसार्ह असल्याचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात केला आहे. आमच्या ईव्हीएम मशिन्स हॅक केल्या जाऊ शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयात आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे संचालक विजय कुमार पांडे यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर करत ईव्हीएम मशिन हॅक झाल्याचं कारण देत दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावल्या पाहिजेत, असं न्यायालयाला निवेदन केलं आहे.भारतात निवडणुकीत वापर करण्यात येणा-या ईव्हीएम मशिन्स या अमेरिका, जर्मनी, नेदरलँड आणि आयरलँडमध्ये वापरात असलेल्या व्होटिंग मशिन्सपेक्षा चांगल्या आहेत. परराष्ट्रात ज्या ईव्हीएम मशिन्स वापरण्यात येतात, त्या इंटरनेटशी जोडलेल्या असतात. मात्र आपल्याकडे तशी व्यवस्था नाही. भारतातील वापरात असलेल्या ईव्हीएम मशिन्स पूर्णतः अंतर्गत प्रक्रियेवर कार्य करतात. या मशिन्स कोणत्याही इंटरनेट सुविधेशी जोडलेल्या नाहीत. त्यामुळे या मशिन्स कोणीही हॅक करू शकत नाही. वेळोवेळी ईव्हीएम मशिन्सची तपासणी केली जाते. कोणत्याही निवडणुकीसाठी मशिन्स पाठवण्याआधी मशिन्सचं पूर्णतः परीक्षणही केलं जातं, असंही केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.विजय कुमार म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोग 2019च्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपीएटीची व्यवस्था करणार आहे. ज्यात मतदान करणा-याला मतदान केल्यानंतर एक व्हेरिफिकेशन पेपरही मिळणार आहे. ते म्हणाले, 2018मध्ये 16 लाखांहून अधिक ईव्हीएम मशिन्समध्ये व्हीव्हीपीएटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यात ईव्हीएम मशिन्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
आमच्या ईव्हीएम मशिन्स अमेरिकेच्या व्होटिंग मशिनपेक्षा उत्तम- निवडणूक आयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 1:54 PM