भोपाळ: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दहापेक्षा अधिक दिवस झाले आहेत. मात्र अद्याप या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. देशवासीयांचा आक्रोश जराही कमी झालेला नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी कायम आहे. मोदी सरकारनं पाकिस्तानची आर्थिक कोंडी सुरू केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधले शेतकरीदेखील मागे नाहीत. छतरपूरमधून पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात नागवेलीच्या पानांची निर्यात होते. मात्र पुलवामातील हल्ल्यानंतर शेतकऱ्यांनी पानांचा पुरवठा रोखला आहे. पाकिस्तानला पानं पाठवणार नाही, असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानात पानांची टंचाई जाणवू लागली आहे.व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक जण पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या प्रयत्नात आहे. छतरपूर जिल्ह्यातील गढिमलहरा, महाराजपूर, पिपट, पनागर आणि महोबामध्ये मोठ्या प्रमाणात नागवेलीचं (पानवेल) उत्पादन होतं. या भागातून देशाच्या अनेक शहरांमध्ये पानांचा पुरवठा केला जातो. याशिवाय पाकिस्तान, श्रीलंकेतखील पानांची निर्यात होते. मात्र सध्या पाकिस्तानात होणारी निर्यात शेतकऱ्यांनी थांबवली आहे. पुलवामा हल्ल्यामुळे शेतकरी अतिशय संतप्त आहेत. 'दहशतवाद्यांमुळे आमच्या जवानांचं रक्त सांडलं आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानला पानांची निर्यात करणार नाही. यामुळे आम्हाला नुकसान सोसावं लागलं तरी चालेल,' असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. छतरपूरमधील पानं मेरठ आणि शहारंगपूरहून पाकिस्तानला निर्याम केला जातात. आठवड्यातून तीन दिवस पानाची 45 ते 50 बंडलं पाकिस्तानला पाठवली जातात. एका बंडलची किंमत 30 हजार रुपये असते. पाकिस्तानला पानं न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानं शेतकऱ्यांचं 13 ते 15 लाखांचं नुकसान होत आहे. मात्र आम्हाला फायदा-तोट्याची चिंता नाही, अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. भारत सरकार पानी रोखण्यासारखा मोठा निर्णय घेऊ शकतं. तर आम्ही देशासाठी, जवानांसाठी इतकं नक्कीच करु शकतो, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
नुकसान सोसू, पण पाकिस्तानला माल पाठवणार नाही; शेतकऱ्यांचा सर्जिकल स्ट्राइक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 4:35 PM