नवी दिल्ली - भारतीय हवाई दल स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाबद्दल फारसे उत्सुक्त नसले तरी सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांनी मात्र या विमानाचे भरपूर कौतुक केले आहे. तेजस हे भारतात विकसित करण्यात आलेले हलक्या वजनाचे लढाऊ विमान आहे. सिंगापूरचे संरक्षण मंत्री इंग हेन यांनी मंगळवारी तेजसमधून उड्डाणाचा अनुभव घेतला. इंग हेन यांनी कालायकुंदा विमानतळावरुन तेजसमधून उड्डाण केले. जवळपास अर्धा तास त्यांना तेजसचे कौशल्य अनुभवता आले.
तेजस एक उत्कृष्ट लढाऊ विमान असून मला या विमानाने आकर्षित केले आहे असे हेन पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तेजस विमानाच्या खरेदीमध्ये सिंगापूरला स्वारस्य आहे का ? या प्रश्नावर हेन म्हणाले कि, मी वैमानिक नाहीय. तांत्रिक विषयाचे जाणकार यासंबंधी निर्णय घेतील.
बहरीन एअर शोच्यावेळीही तेजसने आपले कौशल्य दाखवले होते त्यावेळी मध्य आशियातील काही देशांनी तेजसच्या खरेदीमध्ये रस दाखवला होता असे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी भारतीय हवाई हद्दीच्या संरक्षणासाठी एकटया 'तेजस'वर अवलंबून चालणार नाही. स्वदेशी बनावटीचे हे लढाऊ विमान स्वसंरक्षणासाठी पुरेसे ठरणार नाही असे भारतीय हवाई दलाकडून केंद्र सरकारला सांगण्यात आले. तेजस हे जेएएस 39 ग्रिपेन, एफ-16 या लढाऊ विमानांशी तेजस स्पर्धा करु शकत नाही. ग्रिपेन, एफ-16 च्या तुलनेत तेजसमध्ये अजून भरपूर सुधारणांची आवश्यकता आहे असे हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रिपेन हे स्वीडीश बनावटीचे तर एफ-16 हे अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीने बनवलेले फायटर विमान आहे. परदेशी लढाऊ विमानांऐवजी स्वदेशी बनावटीच्या भारतीय लढाऊ विमानांना प्राधान्य द्या असे केंद्राकडून हवाई दलाला सांगण्यात आले होते. त्यावर हवाई दलाने सरकारसमोर प्रेझेंटेशन सादर केले व एकटे तेजस भारताच्या सर्व हवाई गरजा पूर्ण करु शकत नाही ते निदर्शनास आणून दिले. युद्धाच्या प्रसंगात तेजस फक्त 59 मिनिटे तग धरु शकते तेच ग्रिपेन तीन तास तर एफ-16 चार तास लढण्यास सक्षम आहे.