Nirmala Sitharaman befitting reply: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राज्यसभेत विरोधकांच्या GST व महागाई संदर्भातील प्रश्नांवर उत्तरे दिली. यापूर्वीही खाद्यपदार्थांवर कर लावण्यात आलेत आहेत असे त्यांनी विरोधकांना लक्षात आणून दिले. तसेच महागाई मुळे वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत पण भारताची आर्थिक स्थिती इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. अर्थमंत्र्यांच्या भाषणादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहातून वॉकआउट केले. या आधी सोमवारी देखील अर्थमंत्र्यांनी लोकसभेत महागाईवरील प्रश्नांना उत्तरे दिली होती. त्यावेळीही सभागृहात अर्थमंत्र्यांनी बोलण्यास सुरुवात करताच काँग्रेसने सभागृहातून सभात्याग केला होता.
राज्यसभेत आकडेवारी सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जीएसटीपूर्वी २२ राज्यांमध्ये अनेक गोष्टींवर व्हॅट लागू करण्यात आला होता. खाद्यपदार्थांवर टॅक्स याआधी कधीच नव्हता असे म्हणणे सोपे आहे. पण असे अनेक ठिकाणी घडले आहे. वाढत्या महागाईमुळे वस्तूंची किमती दिवसेंदिवस वाढत आहेत हे सत्य आहे. आम्ही किंवा कोणीही हे सत्य नाकारू शकत नाही. किंमती वाढल्या आहेत आणि ते नाकारता येणार नाही, पण भारताची आर्थिक स्थिती अनेक देशांपेक्षा चांगली आहे. याचा अर्थ असा नाही की आपण महागाईच्या मुद्द्यापासून दूर पळत आहोत. आम्ही चर्चा करण्यासाठी आणि प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येथे आहोत, असे अतिशय मुद्देसूदपणे अर्थमंत्री सीतारामन यांनी आपले मत मांडले.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेराव घालत होते. या दरम्यान अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रुपयामध्ये कोणतीही घसरण झालेली नाही. रुपया त्याच्या योग्य मार्गावर आहे. भारतीय चलनाने इतर देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. यापूर्वी, टीएमसी खासदार लुइझिन्हो फालेरो यांनी दावा केला होता की गेल्या सहा महिन्यांत रुपयाचे अवमूल्यन २८ पट किंवा ३४ टक्क्यांनी झाले आहे. पण हा दावा सीतारामन यांनी खोडून काढला.